अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याबद्दल नगरसेवकपद गमवावं लागलेला महापालिकेचा माजी नगरसेवक यानं मीडियाला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सरकारच्या निर्णयाला आव्हान द्यायचं की नाही? त्यावर याचिका दाखल करायची की नाही?, याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही,’ असं छिंदमनं म्हटलं आहे.

वाचा:

‘अहमदनगर महापालिकेकडून मला नुकतीच आदेशाची प्रत मिळालीय. तो आदेश मी वाचला. तो योग्य आहे की अयोग्य? यावर इतक्यात काही बोलणं योग्य होणार नाही. मंत्र्यांसमोर जे कामकाज आलं, ते त्यांनी पूर्ण केलं. त्या विरोधात याचिका दाखल करायची की नाही याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. तसंच, या निर्णयाविरोधात माझा कोणावरही रोष नाही,’ असं छिंदमनं सांगितलं.

अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर असताना छिंदम यानं महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले होते. संबंधित कर्मचाऱ्यानं रेकॉर्ड केलेलं हे संभाषण व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. छिंदम याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याला तडीपारही करण्यात आलं होतं. भाजपनं त्याच्यावर कारवाई करून त्याची पक्षातूनही हकालपट्टी केली होती. तत्कालीन महापालिका सभागृहानं त्याचं नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव मंजूर करून तो राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडं पाठवला होता. त्यावर निर्णय घेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छिंदमचं नगरसेवक पद रद्द केल्याचा आदेश काढला. तत्पूर्वी, त्याला आपली बाजू मांडण्याची संधी दिली गेली होती. मात्र, तो सुनावणीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळं नगरविकास मंत्र्यांनी त्याला पदच्युत केलं.

वाचा:

पद वाचवायचं असेल तर…

छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव यापूर्वीच्या महापालिका सभागृहानं केला होता. विद्यमान सभागृहाचा हा ठराव नव्हता. मागील निवडणुकीत तो पुन्हा विजयी झाला आहे. मात्र, आधीच्या सभागृहाच्या ठरावावर निर्णय देताना राज्य सरकारनं ‘विद्यमान नगरसेवक पद रद्द’ असं स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळं आता नगरसेवक पद वाचविण्यासाठी छिंदमला न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here