: साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने या उद्योगाला अच्छे दिन येत गोडवा वाढला आहे. याउलट गुळाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होऊनही त्याचे दर न वाढल्याने गुळ उद्योगातील कडवटपणा शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. यामुळे अस्सल कोल्हापुरी गुळाच्या उत्पादनाला फटका बसत आहे. यातून कोल्हापुरातील गुऱ्हाळघरांची संख्या २५ टक्क्यांवर आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात काही वर्षापूर्वी १ हजार ३०० पेक्षा अधिक गुऱ्हाळघरे होती. त्यातून सहा ते आठ महिने गुळाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जात होतं. पण अलीकडे गुळापेक्षा साखर कारखान्यांना ऊस घातल्याने जादा पैसे मिळत असल्याने गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत आहे. दुसरीकडे अस्सल गुळापेक्षा साखर मिश्रीत गुळाला वाढलेल्या मागणीने या उद्योगात आता मात्र कडवटपणा आला आहे.

साखरेचे दर कमी होते. त्यामुळे साखर मिश्रीत गुळ तयार करण्याचा खर्च कमी येत होता. पण गेल्या चार पाच महिन्यात साखरेच्या दरात अचानक किलोमागे पाच ते सहा रूपये वाढ झाली आहे. स्वस्तात मिळणारी साखर महागल्याने गुळाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. त्या तुलनेत गुळाचे दर न वाढल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघराकडे पाठ फिरवली. परिणामी गुऱ्हाळघरे बंद करण्याकडेच कल वाढत आहे.

गुळाला सध्या क्विंटलला ३६०० ते ४२०० रूपये दर मिळतो. यातून उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे साखरेप्रमाणे गुळालाही हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी मागणी करत आहेत. सरकारने याबाबत निर्णय न घेतल्याने या उद्योगाचा कडवटपणा वाढला आहे. यातून सध्या सुरू असलेली अडीचशे गुऱ्हाळघरेही बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. असं झाल्यास कोल्हापुरी गुळाऐवजी कर्नाटकी गुळाला मागणी वाढणार आहे. यातून सेंद्रिय गुळाचे उत्पादनही बंद होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील गुळाची मोठी उलाढाल कमी होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here