मुंबई-गोवा क्रूझमध्ये ड्रग पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला प्राप्त झाली होती. त्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबीचे एक पथक या क्रूझवर पोहोचले. मात्र ही क्रूझ समुद्राच्या मध्यमागी पोहोचल्यानंतर क्रूझवर ड्रग पार्टी सुरू झाली. या पार्टीत उपस्थित लोक खुलेआम ड्रगचे सेवन करत होते. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने कारवाई सुरू केली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी RTPCR या कोडवर्डचा वापर करण्यात आला होता.
एनसीबीच्या पथकातील कर्मचारी क्रूझवर प्रवासी बनून गेल्याने कोणालाही त्यांचा संशय आला नाही. या पथकाने ड्रगचे सेवन करणाऱ्यांना रंगेहात पकडले. एनसीबीच्या या ऑपरेशनदरम्यान एका बॉलिवूडच्या अभिनेत्याच्या मुलाला अटक घेण्यात आले आहे. त्याच्यासोबत एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीने केलेली ही कारवाई मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. याचे कारण म्हणजे एनसीबीने अशा प्रकारे पहिल्यांदाच एखाद्या क्रूझवरच्या मोठ्या ड्रग पार्टीचा पर्दाफाश केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times