हायलाइट्स:
- सातारा जिल्ह्यात भीषण अपघात
- ४५ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार
- दुचाकीही पूर्णपणे जळून खाक
याबाबत घटनास्थळ व औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास बाजीराव गायकवाड (वय ४५) हे वर्धन अॅग्रो कारखान्यातील आपली ड्युटी संपवून रायगाव ता. कडेगाव या आपल्या गावी निघाले होते. ते कारखान्यात इलेक्ट्रिशियन म्हणून कामाला होते. कारखान्यापासून दीड ते दोन किलो मीटर अंतरावर दुचाकीवरून जात असताना समोरुन येणाऱ्या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. तसंच कैलास गायकवाड यांची दुचाकी सुमारे १०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेली.
या अपघातात कैलास गायकवाड यांचा उजवा पाय गुडघ्यापासून खाली पूर्णपणे तुटून पडला होता. तसंच मेंदूलाही जखम झाली होती. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीही जागेवर पेटून जळून खाक झाली. अपघातग्रस्त चारचाकी गाडीही दोन ते तीन वेळा पलटली आणि रस्त्याच्या बाजूकडील खड्ड्यात जाऊन पडली.
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ व पोलीस पोहचण्याआधीच चारचाकी गाडीतील ड्रायव्हर व अन्य व्यक्ती तिथून पसार झाल्या होत्या. कैलास गायकवाड यांच्या अपघाती मृत्यूमुळे कारखाना परिसरात शोककळा पसरली होती. सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली असून अधिक तपास बी.एन.जाधव करत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times