मुंबई :‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील सर्वांचे लाडके नट्टू काका अर्थात अभिनेते घनश्याम नायक यांचं आज निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. निर्माते असित कुमार मोदी यांनी घनश्याम नायक यांचं निधन झाल्याचं सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून घनश्याम नायक यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. घनश्याम यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एक शस्त्रक्रिया झाली होती.
गेल्या ५० हून अधिक वर्षांपासून घनश्याम नायक प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. त्यांना खरी ओळख आणि प्रसिद्धी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेनं दिली. या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. नट्टू काका या पात्राला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. नट्टू काका हे या मालिकेत सुरुवातीपासून जोडलेले होते. त्यांची एक विनोदी शैली, त्यांचे संवाद प्रेक्षकांना आवडायचे.
ही होती शेवटची इच्छा
काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका मुलाखतीत शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. ‘मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे’, असं ते भावूक होऊन म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times