हायलाइट्स:
- दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घसरण
- राज्यात आज २ हजार ६९२ नवीन रुग्णांचं निदान
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२८ टक्के
राज्यात आज २ हजार ७१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ६३,८०,६७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२८ टक्के एवढं झालं आहे.
रुग्णसंख्या कमी होत असली तरी अजूनही काही जणांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. राज्यात आज ४१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे, तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९२,२२,२६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,५९,३४९ (११.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४३,१५२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर १,३८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोणत्या जिल्ह्यांत अद्यापही करोनाबाबत चिंता कायम?
सध्याच्या स्थितीत राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ हजारांहून अधिक आहे. यामध्ये मुंबईत ५३७४, ठाण्यात ६२८४, पुण्यात ८४९१ आणि अहमदनगरमध्ये ५१७३ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये नुकतीच कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील ज्या इतर भागांमध्ये करोना प्रादुर्भाव आटोक्यात आलेला नाही अशा परिसरातही पुन्हा लॉकडाऊन करण्यात येण्याची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times