हायलाइट्स:
- भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू
- रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली घटना
- दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ
बंडू ऊर्फ गौतम जागो सालवणकर (वय ५५), चिन्नू विनोद सोनबरसे (वय १३ दोन्ही रा.सातनवरी), शिराली सुबोध डोंगरे (वय ६) आणि शौर्य सुबोध डोंगरे (वय ९ दोन्ही रा. इसापूर, ता.मौदा), अशी मृतकांची तर ललिता बाबूलाल सोनबरसे (वय ५० रा.सातनवरी) असं जखमीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास बंडू, चिन्नू, शिराली, शौर्य व ललिता हे पाच जण सातनवरी बसथांब्यावर बसची वाट बघत होते. याचवेळी अमरावतीहून नागपूरला जाणारी कार भरधाव वेगाने येत होती. तेव्हा वाटेत खड्डा असल्याने कार चालकाने तो वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित कार रस्तादुभाजकावर आदळली. त्यानंतर कारने पाचही जणांना धडक दिली व उलटली.
घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पाचही जखमींना नागपुरातील हॉस्पिटलकडे रवाना केले. मात्र तिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर चौघांना मृत घोषित केले. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times