हायलाइट्स:
- दीड वर्षाने आज उघडणार शाळा
- विद्यार्थ्यांचे स्वागत व्हावे या उद्देशाने शिक्षकांची जय्यत तयारी
- पहिल्या दिशवी ‘शिक्षणोत्सव’ साजरा होणार
तब्बल दीड वर्षाने आज, सोमवारपासून शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरणार आहेत. शाळा सुरू (maharashtra 2021 मध्ये शाळा पुन्हा उघडल्या जातील) करताना विद्यार्थ्यांचे स्वागत व्हावे या उद्देशाने शिक्षकांनी जय्यत तयारी केली आहे. काही शाळांनी रांगोळी काढली आहे, याचबरोबर सॅनिटायझरपासून अन्य सुविधाही सज्ज ठेवल्या आहेत.
दीड वर्षाहून अधिक काळानंतर शाळेत उपस्थिती लावण्याची संधी मिळत असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यातील शाळांमध्ये स्वागतोत्सव साजरा केला जाणार आहे. करोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू होत असताना पहिल्या दिशवी ‘शिक्षणोत्सव’ साजरा करावा, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सांगितले आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांना शाळांना भेटी देण्याच्या सूचना केल्या आहेत. या शाळाभेटींचे फोटो, व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध करावेत, असेही आयुक्तांनी काढलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही पोस्ट पब्लिक म्हणून शेअर करावी तसेच फेसबूक स्टोरी म्हणून शेअर न करता वॉलवर शेअर करावी, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. व्हिडीओ दोन ते तीन मिनिटांचा असावा आणि तो पोस्ट करताना #MVMJ2021 #शिक्षणोत्सव या हॅशटॅगचा वापर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सर्व पोस्ट करताना शिक्षण विभागाच्या विविध अकाऊंट्सना टॅग करावे, असेही सांगण्यात आले आहे.
गणवेश लवकरात लवकर द्यावा
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना संचालकांनी या पत्रात केल्या अहोत. तसेच ज्या शिक्षकांचे लसीकरण झाले नसेल त्यांचे तातडीने लसीकरण करून त्यांना शाळेत रुजू होण्यास सांगावे. लसीकरण झाले नाही म्हणून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना अनुपस्थित राहता येणार नाही, असेही या पत्रातून स्पष्ट केले आहे.
‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’
आज, सोमवारी दुपारी १२नंतर मुख्यमंत्री ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, मुख्याध्यापक व शिक्षकांना संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम युट्युबवरून लाइव्ह होणार असून तो सर्वांनी पाहणे आवश्यक असणार आहे, असेही या पत्रात सांगण्यात आले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times