पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे ही हृदयद्रावक घटना घडली. येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केली अन् त्याचदिवशी रात्री या मुलाच्या वडिलांनी विषप्राशन करून आत्महत्या केली.
कवितेचं कौतुक अन् दु:खाचा डोंगर…
मराठी मातृभाषादिनानिमित्त भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली कविता या स्पर्धेत सादर करावी, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार भारजवाडी येथील हनुमान वस्तीवर असलेला तिसरीतील विद्यार्थी प्रशांत बटुळे याने, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, या अशयाची कविता रचली व सादर केली.
शेतात कष्ट करूनही तुझ्या डोक्याला ताप, आरे बळीराजा नको करू आत्महत्या, पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकर, कसे उन्हात करतात शेती, पीक उगवणी मिळतात पैसे, शेती करूनही तुझ्या हाताला फोड, आरे बळीराजा नको करू आत्महत्या
अशा काव्य ओळी रचून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, अशी साद प्रशांतने घातली. उपस्थित सर्व मान्यवरांकडून त्याच्या कवितेचे कौतुक झाले; मात्र, ही कविता सादर करून तो आपल्या घरी आला अन् रात्री उशिरा त्याचे वडील मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी विषप्राशन केल्याचे त्याला समजले. मल्हारी यांना जवळच्या नातेवाईकांनी नगर येथे तातडीने हलवले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मल्हारी बटुळे यांची शेती होती; मात्र, सततच्या नापिकीमुळे ते त्रस्त होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times