हायलाइट्स:
- प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- झेड सिक्युरिटी मागे सोडत प्रियांका गांधी पहाटेच लखीमपूरला दाखल
- प्रियांका मला माहीत आहे की तू मागे फिरणार नाहीस, राहुल गांधींचं ट्विट
लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांची पुन्हा एकदा उत्तर प्रदेश पोलिसांशी बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतलंय. ‘हॅलो सीओ साहेब, ऑर्डर कुठंय? ऑर्डर काढा’ असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी पोलिसांना विचारला. मात्र, यानंतर उत्तर पोलिसांकडून प्रियांका यांना ताब्यात घेण्यात आलं.
भाजप सरकारकडून शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचं राजकारण सुरू आहे, असा आरोप यावेळी प्रियांका गांधी यांनी केलाय. यावेळी प्रियांका गांधी यांनी पोलिसांना फटकारलंय. ‘ज्या पद्धतीनं तुम्ही मला धक्का दिला, जबरदस्तीनं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला ती शारीरिक हिंसा आहे. हा अपहरणाचा प्रयत्न ठरू शकतो. मी समजावते, मला हात तर लावून दाखवा. जाऊन अगोदर आपल्या अधिकाऱ्यांकडून, मंत्र्यांकडून वॉरंट घेऊन या… ऑर्डर घेऊन या… अटकेसाठी महिला पोलिसांना पुढे करू नका. महिलांशी कसं बोलावं हे अगोदर शिकून या’ असंही यावेळी प्रियांका गांधी पोलिसांना दरडावून सांगताना दिसल्या.
आपली झेड सिक्युरिटी मागे सोडून एका ड्रायव्हरसरहीत प्रियांका गांधी यांनी चार तास नवी दिल्लीकडून लखीमपूरकडे जाण्याचा प्रयत्न केला. सकाळी साडे पाच वाजल्या दरम्यान त्यांना लखीमपूर खीरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. रात्री १२.०० वाजल्यापासून ५.३० वाजेपर्यंत प्रियांका गांधी आणि प्रशासनाचा लपाछपीचा खेळ सुरू होता. यानंतर पोलीस प्रियांका गांधी यांना बटालियन गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेले.
राहुल गांधींकडून बहिणीला प्रोत्साहन
लखीमपूरला जाणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांकडून रोखण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या बहिणीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. ‘प्रियांका मला माहीत आहे की तू मागे फिरणार नाहीस. ते तुझ्या हिंमतीला घाबरले आहेत’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय.
एफआयआर दाखल, अटक नाही
दरम्यान, लखीमपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यासहीत १५ जणांविरोधात एफआयआर दाखल केलीय. मात्र अद्याप या घटनेत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times