गडचिरोली: पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेला नक्षलवाद्याचा उत्तर गडचिरोली विभागाचा कमांडर-इन-चीफ विलास उर्फ दासरू कोल्हा (वय ४४ वर्षे) याने आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. कोल्हाकडून एके-४७ रायफल व ३५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. विलास कोल्हावर १४९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर २० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. कोल्हाच्या आत्मसमर्पणाने नक्षली कारवायांना मोठी जरब बसणार आहे.

विलास कोल्हाचे आत्मसमर्पण हे महाराष्ट्र पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. पोलीस अनेक वर्षांपासून कोल्हाच्या मागावर होते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कारवायांत कोल्हाचा हात राहिला आहे. कोल्हाच्या आत्मसमर्पणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माध्यमांना माहिती दिली.

विलास कोल्हावर १४९ गुन्हे दाखल आहेत. त्यातील ३० गुन्हे हत्या प्रकरणी दाखल आहेत तर ४० गुन्हे पोलिसांसोबतच्या चकमकीचे आहेत. गडचिरोलीतील एटापल्लीचा रहिवासी असलेल्या विलासवर दोन्ही राज्यांनी मिळून २० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. मरकेगाव आणि हत्तीगोटातील भूसुरुंग स्फोटात विलासचा थेट सहभाग होता. या स्फोटात २९ जवान शहीद झाले होते. अशाच आणखी एका स्फोटात ७ पोलिसांना वीरमरण आले होते. कुरखेडा स्फोटात १६ पोलीस शहीद होण्यासही विलास कोल्हाच कारणीभूत होता. १ मे २०१९ रोजी ही घटना घडली होती. दादापूर येथे विलास कोल्हा व त्याच्या साथीदारांनी पोलीस वाहनांची जाळपोळ केली. त्यानंतर घटनास्थळी जवान जात असतानाच रस्त्यात स्फोट घडवून आणण्यात आला होता.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून नक्षलवादी कारवायांना मोठ्या प्रमाणात लगाम घालण्यात आला आहे. अबुजमाडसह नक्षलवाद्यांच्या अनेक अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याच कारवाईचा धसका घेऊन आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचे चार सदस्य, दोन कमांडर, दोन उपकमांडर यासह २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here