हायलाइट्स:

  • केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी चर्चेत
  • लखीमपूर खीरी हिंसाचारात अजय मिश्र यांचा पुत्र आशिष मिश्र याच्यावर आरोप
  • केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेनी यांचा जुना व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : कृषी आंदोलना दरम्यान शेतकरी आंदोलना दरम्यान उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचारानंतर खीरी मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी चर्चेत आलेत. अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र यानं आंदोलकांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून आणि विरोधकांकडून करण्यात येतोय. या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेनी यांचा जवळपास २० दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम

एका सभेला संबोधित करताना अजय मिश्र टेनी यांनी केलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतरच शेतकऱ्यांनी त्यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. काल (रविवारी) याच भाषणाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. अजय मिश्र यांच्यासोबत बनबीरपूरमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या जाहीर कार्यक्रमाचा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला. याचवेळी एका काळ्या जीपनं काही शेतकऱ्यांना धडक दिली.

‘आंदोलकांनो, सुधरा नाहीतर…’

आंदोलकांवर रोष व्यक्त करताना ‘तुम्हीही शेतकरी आहात मग तुम्ही का आंदोलनात उतरला नाहीत. मी उतरलो असतो तर त्यांना पळण्यासाठीही जागा उरली नसती. १०-१५ लोक येऊन आरडा-ओरडी करतात. गेल्या दहा अकरा महिन्यांत संपूर्ण देशभरात हे आंदोलन फैलायला हवं होतं. मात्र, असं झालं नाही. मी अशा लोकांना लोकांना सांगतो की सुधरा… नाहीतर येऊन आमचा सामना करा, आम्हाला तुम्हाला सुधरवण्यासाठी केवळ दोन मिनिटं लागतील. मी केवळ मंत्री नाही किंवा केवळ खासदार, आमदार नाही. या पदावर बसण्यापूर्वीपासून जे लोक मला ओळखतात त्यांना माहीत आहे की मी कोणत्याही आव्हानापासून पळ काढत नाही’ असं म्हणताना या व्हिडिओत केंद्रीय मंत्री अजय मिश्र म्हणताना दिसत आहेत.

Lakhimpur Kheri violence: पोलिसांनी रस्त्यावर उभा केला ट्रक, अखिलेश यादवांना लखीमपूरला जाण्यापासून रोखलं
​VIDEO: ‘हात तर लावून दाखवा’, लखीमपूरला जाणाऱ्या प्रियांका गांधींनी पोलिसांना शिकवला कायदा

कोण आहेत अजय मिश्र टेनी?

राजकारणात सक्रीय होण्यापूर्वी अजय मिश्र टेनी शेतकरी आणि व्यवसायिक म्हणून ओळखले जात होते. तसंच ते वकिली व्यवसायतही होते. एक दबंग आणि बाहुबली नेते म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. याचं कारण म्हणजे, कुस्तीची त्यांची आवड… आपल्या सुरुवातीच्या काही दिवसांत अजय मिश्र स्वत: कुस्ती करत होते.

२००० साली अजय मिश्र यांच्याविरोधात एक खुनाचा गुन्हाही दाखल झाला होता. परंतु, २००४ साली स्थानिक न्यायालयानं त्यांना आरोपमुक्त केलं.

अजय मिश्र यांची राजकीय कारकीर्द

– २०१२ मध्ये विधानसभा निवडणुकीत लखीमपूर – खीरीच्या निघासन मतदारसंघातून ते निवडून आले

– २०१४ मध्ये भाजपनं त्यांना खीरी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. यावेळी त्यांनी बसपा उमेदवार अरविंद गिरी यांना १ लाख १० हजार मतांच्या फरकानं मात दिली.

– २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी समाजवादी पक्षाच्या पूर्वी वर्मा यांना जवळपास २ लाख २५ हजार मतांच्या फरकानं पछाडलं.

– नुकत्याच झालेल्या मोदी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी राज्य मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना केंद्रीय गृहराज्य मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Lakhimpur Kheri violence: शेतकऱ्यांना चिरडलं, मंत्रीपुत्र आशिष मिश्रा विरुद्ध गुन्हा दाखल
lakhimpur kheri : यूपीत लखीमपूर-खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडलं? तणावाचं वातावरण

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here