जळगाव: राजकारणी नेहमीच बातम्यांचा विषय असतात… न्यूजमध्ये असतात… टीका-टिप्पणीचा सामना करत असतात… पण हेच राजकारणी बनले तर?… काय? वाटलं ना आश्चर्य! पण ते खरंय… राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार या घटकाभर का होईना पण, चक्क न्यूज अँकर बनल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची म्हणजे शेतकरी कर्जमाफीची बातमीही सांगितली. आणि हो, ही बातमी सांगताना त्यांनी बातमीत स्वत:चं अॅडिशनही घेतलं!

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट दिली आणि नेहमी बातम्यांमध्ये राहणाऱ्या सुप्रिया सुळेंवर बातम्या सांगण्याची वेळ आली. सर्वांच्या आग्रहा खातर त्यांनी चक्क बातम्याही सांगितल्या. त्यांनी एकच बातमी सांगितली आणि तीही शेतकरी कर्जमाफीची. बातमी सांगताना सुरुवातीला त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. मात्र, नंतर त्यांनी सफाईदारपणे बातमी सांगितली. सुप्रिया सुळे यांनी स्टुडिओत जाऊन, ‘नमस्कार सकाळच्या बातम्या…’ अशी बातम्या सांगण्यास सुरुवात केली. समोरच्या प्रॉम्पटरवरील बातम्या त्या हळूहळू वाचत होत्या.

‘नमस्कार, सकाळच्या बातम्या. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू झाली असून तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. उपमुख्यमंत्री ही घोषणा करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते,’ अशी बातमी सुळे यांनी दिली. यावेळी त्यांनी ‘उपमुख्यमंत्री ही घोषणा करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते,’ असं म्हणत हे माझं क्रिएशन आहे, असं सांगितलं. तेव्हा उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

सुळे यांनी जळगाव-धुळे दौऱ्यात जळगाव येथील हरिजन कन्या छात्रालय या शाळेतील विद्यार्थींनींशी संवाद साधला. जळगावातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशाळा तसेच उद्योजकता विकास मंचाने ‘उड्डान : संजीवनी नव-उद्योजकांसाठी’ या परिसंवादात भाग घेतला. धुळ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जळगावातील पत्रकारांशी मनसोक्त गप्पाही मारल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here