हायलाइट्स:

  • भाजप नेत्यांकडून अजित पवार यांच्यावर आरोप
  • साताऱ्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी दिलं उत्तर
  • जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबतही केलं भाष्य

सातारा : जरंडेश्‍‍वर सहकारी साखर कारखान्‍यातील कारभारावरून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्‍या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी अजित पवार |) यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांबाबत आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जरंडेश्‍‍वर कारखान्याबाबत मला काहीही बोलायचं नाही. जे असेल ते नियमाप्रमाणे होईल. संपूर्ण राज्‍याला माहीत आहे की मी नियमाप्रमाणे वागणारा माणूस आहे. जे काही लोक माझ्‍याबाबत बोलतात, मला असल्‍या लोकांनाही उत्तर द्यायचं नाही,’ असं ते म्हणाले.

सातारा जिल्‍हा बँकेबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील हे निर्णय घेतील, असंही अजित पवार यांनी स्‍पष्‍ट केलं आहे.

साताऱ्यात दोन्ही राजेंना पुन्हा आव्हान? राष्ट्रवादीच्या गोटात नव्या हालचाली

जिल्हा बँकेत महाविकास आघाडी?

जिल्‍हा बँकेत महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवणार का, या प्रश्‍‍नावर बोलताना अजित पवार म्‍हणाले की, ‘आम्‍ही राज्‍याचे बघत असतो. स्‍थानिक पातळीवरचा निर्णय स्‍थानिक पदाधिकारी घेत असतात. जिल्‍हा बँकेबाबत रामराजे व इतर सहकारी निर्णय घेतील,’ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

‘…म्हणून सहकार गोत्यात आला आहे’

‘सहकार चळवळ दिवंगत यशवंतराव चव्‍हाण व इतर पदाधिकाऱ्यांनी स्‍थापन केली. त्‍यावेळी सहकार योग्‍य लोकांच्‍या हातात होता. नंतरच्‍या काळात त्‍यात इतर लोक शिरले. व्‍यावसायिक दृष्‍टिकोन तसेच शिस्‍त न बाळगल्‍याने सहकार गोत्‍यात आला आहे. यापुढील काळात सभासदांनी चांगल्‍या लोकांच्‍या ताब्‍यात कारखाने द्यायला पाहिजेत. कारखानेच नाहीत तर इतर सहकारी संस्‍था देखील चांगल्‍या विचारांच्‍या व्‍यक्‍तींच्‍या ताब्‍यात देणे आवश्‍‍यक आहे,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्‍या टीकेबाबत विचारले असता अजित पवार म्‍हणाले, ‘ मला त्‍यावर काहीच बोलायचे नाही. विकासावर बोलू की,’ असं म्हणत अजित पवार यांनी उदयनराजेंवर अधिक बोलणं टाळलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here