हायलाइट्स:
- एफआरपीच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक
- शरद पवार यांच्या दौऱ्यावेळी आंदोलनाचा इशारा
- जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांची घोषणा
‘सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांची एफआरपी देण्यास टाळाटाळ करत आहेत. तीन टप्प्यात एफआरपी देण्यास आपला विरोध असून एफआरपीची रक्कम ही एकाच टप्प्यात कारखानदारांकडून शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे,’ असं जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चावेळी प्रभाकर देशमुख यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या साखर कारखानदारांना त्यांचे कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेले कारखाने बाहेर काढण्यासाठी पवारांकडून ५० ते १०० कोटी रुपये दिले जातात. परंतु शेतकऱ्यांच्या एफआरपीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बैठक का लावत नाहीत?’ असा प्रश्न प्रभाकर देशमुख यांनी उपस्थित केला आहे
‘आता एफआरपीचे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून येत्या ८ तारखेला शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या गाडीच्या ताफ्यासमोर आपण झोपून आपली मागणी मान्य करून घेऊ, येत्या दोन दिवसात शरद पवारांनी याबाबत तातडीने बैठक लावून प्रश्न मार्गी लावावा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात,’ अशी मागणीही प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.
दरम्यान, याबाबत सोमवारी मोर्चातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times