हायलाइट्स:
- शेतकरी हत्याकांडानंतर महाराष्ट्रात काँग्रेस आक्रमक
- मोदी आणि योगी सरकारवर जोरदार टीका
- सोलापुरात निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध
“भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा मोदी आणि योगीच्या ‘जनरल डायरचे वंशज’ सत्तेवर आहेत असं वाटत आहे. या घटनेने इंग्रजी राजवटीची आठवण करून दिली आहे. मोदी आणि योगी भाजप सरकारचा शेतकरी विरोधी अमानवीय, खुनी चेहरा समोर आला आहे,” असा हल्लाबोल काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केला आहे.
‘उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने केलेल्या शेतकरी हत्याकांडनंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधी यांना अटक केल्याच्या व शेतकरी हत्याकांडाचा निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस भवन सोलापूर येथे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले,’ अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.
यावेळी योगी-मोदी सरकार मुर्दाबाद, प्रियांका गांधी यांना अटक करणाऱ्या शेतकरीविरोधी नरेंद्र मोदी, योगी सरकारचा निषेध असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रकाश वाले म्हणाले की, ‘गेल्या एक वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर व देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. काल उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे शांततापूर्ण आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने गाडी घातली आणि ८ शेतकऱ्यांची हत्या केली.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times