हायलाइट्स:
- शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग
- देवीच्या नित्य अंलकार आणि नवरात्रातील अलंकारांची स्वच्छता
- सुवर्ण कारागिरांनी दिवसभर केली स्वच्छता
देवीच्या खजिन्याचे मानकरी महेश खांडेकर यांनी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास देवीचे दागिने स्वच्छतेसाठी दिले. रविवारी देवीच्या पूजेतील प्रभावळ, पालखी, पायऱ्या, आरती व पूजेचे साहित्य अशा चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. सोमवारी सकाळी दहा वाजता मानकरी खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गरुड मंडपात दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये सर्वप्रथम देवीच्या नित्य वापरातील दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. कवड्याची माळ, सोन्याचा चंद्रहार, मोहनमाळ, मोहरांची किंवा पुतळ्याची माळ, ठुशी, म्हाळुंग फळ, नथ, मोरपक्षी, कुंडल या अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. रिठ्याच्या पाण्यात दागिने स्वच्छ धुण्यात आले.
नवरात्रोत्सव काळात देवीची अलंकार पूजा बांधली जाते. त्यासाठी लागणाऱ्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये जडावाचा किरीट, जडावाचे कुंडल, चिंचपेटी, लप्पा, सातपदरी कंठी, बाजूबंद, मोत्याचा माळ, पान, देवीचे मंगळसूत्र या अलंकारांचा समावेश होता.
नवरात्र उत्सव आणि रोज अलंकार पूजा बांधण्यापूर्वी खजिन्याचे मानकरी खांडेकर हे दुपारी बारा वाजता सोन्याचे अलंकार श्रीपूजकांना देतात. त्यानंतर रात्री पूजा उतरल्यानंतर दागिने परत देतात. पितळी उंबऱ्याच्या गाभाऱ्यात खजिन्याची खोली आहे. नवरात्र उत्सव आणि सणाच्या काळात नित्य वापरातील दागिन्याबरोबर श्रीपूजकांच्या मागणीप्रमाणे दागिने उपलब्ध करुन दिले जातात. रोज दागिने देवाणघेवाणीची नोंद होत असते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times