हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपनगरातील विशेष मुलांच्या एका निवासी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. शाळेच्या मुख्याध्यापिका वर्गाची पाहणी करत असताना त्यांना एका वर्गातील मुलं खेळताना दिसली. त्यामुळे त्यांनी त्या वर्गातील शिक्षकाला मुलांना सकाळच्या सत्रात शिकवित जावा आणि दुपारी खेळायला सोडत जावा, अशा सूचना केल्या. मुख्याध्यापिकेच्या या सूचना पचनी न पडल्याने हा भयंकर संतापला. त्याने रागाच्या भरात सर्वांसमोर मुख्याध्यापिकेला शिवीगाळ करीत अश्लील हावभाव केले. त्यामुळे या मुख्याध्यापिका घाबरून गेल्या. त्यानंतर काही कळण्याच्या आत या शिक्षकाने मुख्याध्यापिकेला भिंतीच्या कडेला ढकलून त्यांचा विनयभंग केला. तसेच, मुख्याध्यापिकेच्या कानाखालीदेखील लगावली. त्यामुळे या मुख्याध्यापिका प्रचंड घाबरल्या आणि त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे शाळेतील इतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांची सुटका केली.
या घटनेमुळे प्रचंड धक्का बसल्याने धायमोकलून रडणाऱ्या या मुख्याध्यापिकेला सर्वजण समजावत असतानाच या शिक्षकाने तिथून पोबारा केला. मुख्याध्यापिकेने सर्व प्रकार कथन केल्यानंतर तात्काळ हडपसर पोलिसांना त्याबाबतची माहिती देण्यात आली. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलिस उपनिरीक्षक बांबे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, आरोपी शिक्षक फरार झाल्याने त्याचा शोध घेतला जात असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times