हायलाइट्स:
- बेफामपणे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालणारा तो ड्रायव्हर कोण?
- मंत्रीपुत्र आशिष मिश्रावर शेतकऱ्यांचा आरोप
- ‘अन्नदात्यांना चिरडणाऱ्या व्यक्तीला अद्याप अटक का झाली नाही?’
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक एसयूव्ही गाडी शेतकरी आंदोलकांना चिरडून जाताना दिसत आहे. या गाडीनं शेतकऱ्यांना चिरडल्यानंतरही त्यामागोमाग आणखी एक गाडी बेफामपणे जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक संवेदनशील नागरिकांना धक्का बसलाय.
‘लखीमपूर खीरी हिंसाचार’ प्रकरणाचा व्हिडिओ म्हणून सोशल मडियावर शेअर केल्या जाणाऱ्या या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी अद्याप पोलिसांकडून करण्यात आलेली नाही. तसंच या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेली व्यक्ती कोण? हे या व्हिडिओतून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
प्रियांका गांधी यांनी विचारला पंतप्रधानांना प्रश्न
हा व्हिडिओ काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्याकडूनदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ‘नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारनं कोणत्याही आदेशाशिवाय आणि एफआयआर शिवाय गेल्या २८ तासांपासून ताब्यात ठेवलंय. मात्र, अन्नदात्यांना चिरडणाऱ्या या व्यक्तीला अद्याप अटक का झाली नाही?’ असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी विचारला आहे.
२५ सेकंदाच्या या व्हिडिओत गाडी बेफामपणे शेतकऱ्यांना धडक देत जाताना दिसून येत आहे. सायरन वाजवत आणखीन एक वाहन या गाडीचा पाठोपाठ त्याच रस्त्यावरून पुढे निघते. इतर आंदोलक शेतकरी कसाबसा आपला जीव वाचवताना या व्हिडिओत दिसून येत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी दिलेली माहिती या व्हिडिओशी मिळती जुळती असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. ‘वाहनानं शेतकऱ्यांना पाठीमागून धडक दिली होती’ असं त्यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं होतं. तसंच गाडीचा रंग, मॉडेल यांचीही त्यांनी माहिती दिली होती.
मंत्र्यांच्या ताफ्यातील एका गाडीनं आंदोलनकर्त्यांवर गाडी चढवल्यानंतर हिंसाचार उफाळला होता. घटनास्थळावरून समोर आलेल्या दृश्यांत काही गाड्या पेटवून दिल्याचं समोर आलं होतं. तसंच शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालणारा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रा याच्यासहीत १४ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असली तरी अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times