हायलाइट्स:
- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये साजरा करणार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’
- लखीमपूर खीरी हिंसाचारानंतर राज्यात तणावाचं वातावरण
- भाजप मंत्र्याच्या मुलाला अद्याप अटक का नाही? प्रियांका गांधींचा सवाल
याच दरम्यान, लखीमपूर हिंसाचाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत भाजपशी संबंधित व्यक्तींची एक गाडी शेतकऱ्यांना चिरडून पुढे जाताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ दाखवत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लखीमपूरला भेट देण्याचं आवाहन केलंय.
‘मोदीजी नमस्कार. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही लखनऊ येणार असल्याचं समजतंय. पण तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात का?’ असं म्हणत प्रियांका गांधी यांनी मोबाईल हातात घेऊन हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावरून समोर मांडला आहे.
‘या व्हिडिओत आपल्या सरकारमधल्या मंत्र्यांचा मुलगा शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडताना दिसत आहे. व्हिडिओ पाहा आणि या देशाला सांगा की या मंत्र्याचा अद्याप राजीनामा का घेण्यात आलेला नाही? तसंच मंत्र्याच्या मुलाला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही. मला जाणून घ्यायचंय की ही व्यक्ती अद्याप मोकळी का फिरतेय? माझ्यासारख्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुमही कोणत्याही आदेशाशिवाय आणि एफआयआरशिवाय ताब्यात ठेवलंय’ असं म्हणत प्रियांका यांनी राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधलाय.
‘हे लक्षात ठेवा की आपल्याला स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी मिळवून दिलंय. आजही शेतकऱ्यांची मुलं देशाच्या सीमांची सुरक्षा करत आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी त्रस्त आहेत. आपला आवाज पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही हा आवाज नाकारण्याचा प्रयत्न करत आहात. मी तुम्हाला आग्रह करते की लखीमपूरला या. या देशाचा आत्मा असलेल्या अन्नदात्यांची पीडा ऐकून आणि समजून घ्या. त्यांची रक्षा करणं हा तुमचा धर्म आहे… तुमचं कर्तव्य आहे… जय हिंद, जय किसान’ असं म्हणत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांना लखीमपूरला येण्याचं आवाहन केलंय.
लखीमपूर हिंसाचारानंतर पीडितांना भेट देण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधी यांनी सोमवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. २८ तास उलटल्यानंतरही त्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पीडितांची भेट घेतल्याशिवाय आपण इथून हलणार नसल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलंय.
आपल्या आजच्या लखनऊ दौऱ्यात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘शहरी संमेलनात’ही सहभागी होतील तसंच ते अनेक शहर विकास योजनांचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानं पंतप्रधानांच्या या दौऱ्याची माहिती दिलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times