कल्पेशराज कुबल

दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘चुंबक’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेल. अत्यंत संवेदनशील असे या सिनेमाचे लेखन होते. हे लिखाण केलेल्या सौरभ भावेचाच ‘बोनस’ हा सिनेमा. यावेळी सौरभने कथा, पटकथा, संवाद आदी लेखनाची जबाबदारी पार पाडली, पण त्याबरोबरच दिग्दर्शनही केले आहे. ‘बोनस’मधून त्याने ‘छोट्या क्षणांची बंपर गोष्ट’ गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडली. दिग्दर्शक म्हणून सिनेमाची धुरा सांभाळताना तो स्वतःच्या लेखनाच्या मोहात पडलेला नाही. त्यामुळे सिनेमा प्रसंग, संवाद कुठेही रेंगाळलेले वाटत नाहीत. कथेचा जीव छोटासा आहे. पण, या छोट्याशा कथानकाची हाताळणी करताना आणि त्याचा कथाविस्तार पडद्यावर मांडताना प्रेक्षकांच्या दृष्टिकोनाचाही विचार दिग्दर्शकानं केला आहे. त्यामुळे, एक हलकीफुलकी गोष्ट मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते. ‘बोनस’ची ही गोष्ट आपलीशी वाटते, कारण मनोरंजन करण्याचा मोठा आविर्भाव हा सिनेमा आणत नाही. केवळ एका सरळ रेषेतील गोष्ट आपल्याला आपल्या भाषेत सांगतो.

सिनेमाची गोष्ट एका सुखवस्तू उच्चभ्रू कुटुंबातील आदित्य () भोवती फिरते. आजोबा आणि वडिलांसोबत आदित्य कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतो. एकदम टापटीप राहणीमान, एसीशिवाय झोप न येणारा, आहार ‘वेगन’ (प्राणी आणि प्राणिजन्य पदार्थ न खाणारा) असेलला आदित्य हा खूप महत्त्वाकांक्षी तरुण. त्यांच्या कंपनीतील मजुरांना वेगळ्याच्या वेळी पगार आणि दरवर्षी पगारवाढ मिळत असताना; त्यांना अधिकचा बोनस देणे त्याला रुचत नसते. बोनस देण्याच्या तो विरोधात. परंतु आदित्यचे आजोबा (मोहन आगाशे) यांनी मोठ्या कष्टाने आणि मजुरांच्या हिमतीवर ही कंपनी उभी केली असते. त्यामुळे, आजोबांचा आग्रह की, मजुरांना बोनस मिळायलाच हवा. आता ‘बोनस’ द्यायचा की नाही या विचारातून आदित्य आणि आजोबांमध्ये पैज लागते. यात सर्वसामान्य मजुराप्रमाणे एक महिना आयुष्य जगण्याचे आव्हान आजोबा आदित्यला देतात. खिशातील आठ हजार रुपयांमध्ये महिना काढण्यासाठी त्याला नाशिकहून मुंबईला पाठवतात. मुंबईतील कोळीवाड्यात त्याला पाच हजार रुपये भाडे देऊन एक छोटसे घर मिळते. आता हातात उरलेल्या तीन हजारांमध्ये तो मुंबईत महिना कसा काढतो; हे दाखवणारा हा सिनेमा.

‘कोळीवाड्यातील जग आणि आणि सुखवस्तू जग हे वेगळे आहे’ असा दृष्टिकोन असणाऱ्या आदित्यसमोर कोळीवाड्यातील एक महिना खूप चढ-उतारांचा जातो. (आदित्य उच्चभ्रू कुटूंबातील असल्यामुळे त्याला या जीवनशैलीशी जुळवून घेणे अवघड जाते.) पण, त्याच्या आयुष्यात मीनल (पूजा सावंत) ही तिथली मुलगी येते आणि आदित्यचे पुढे काय होतं? तो ही पैज जिंकतो का? हे जाणून घेण्यासाठी सिनेमा पाहायला हवा.

‘छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख आहे’ अशी टॅगलाइन या सिनेमाला आहे. पण, या गोष्टींचा आस्वाद घेणे का मोलाचे आहे; हे सिनेमा पाहताना समजून येईल. सोबतच मुंबईतील कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या मंडळींना हा सिनेमा आपलासा वाटणारा आहे. दिग्दर्शकाने वाडीतील संस्कृती आणि एकोप्याचे चित्रण केले आहे. सिनेमाची गोष्ट छोटीशी असली तरी त्याचे सार छान आहे. त्यामुळे पैजेचा निमित्ताने आदित्यच्या समोर उभा ठाकलेला हा पेचप्रसंग गंमतीशीर आणि भावनिकही आहे. संपूर्ण सिनेमाभर प्रामुख्याने दिसताना गश्मीरने आधीच्या सिनेमांप्रमाणेच इथेही चोख काम केले आहे. त्याच्या भूमिकेतील दोन्ही रंग (उच्चभ्रू आणि कोळीवाड्यातील) त्यानं उत्कृष्ट निभावल्या आहे. सहज अभिनयाने आदित्यच्या भूमिकेत तो चपखल बसतो. पूजानेही तिच्या वाट्याला आलेले सर्व प्रसंग नेमके उभे केले आहेत. तिच्या भूमिकेची एक खासियत म्हणजे तिची वेशभूषा. कोळीवाड्यातील स्थानिक मुलगी म्हणून ती शोभते. सिनेमाची लांबी मर्यादित आहे; पण कथानकात शेवटी आणखी काहीतरी घडण्याची अपेक्षा होती. कदाचित, आदित्य आणि मीनलची प्रेमकथा जाणून घेण्यासाठी आगामी वर्षात ‘बोनस २’ची वाट पाहावी लागेल. आत्तापुरती दिग्दर्शकाने कथानकाची गोष्ट जरी संपविली असली; तरी त्यातील पात्रांची पुढची गोष्ट समोर यायला हवी. सिनेमा ज्या नजरेतून गोष्ट सांगतो ती संजय मेमाणे यांच्या छायांकनाची नजर रेखीव आणि रंगीबेरंगी आहे.

निर्माते : अर्जुन सिंग बरन, कार्तिक निशाणदार

कथा/पटकथा/ संवाद आणि दिग्दर्शक : सौरभ भावे

संगीत : रोहन रोहन

छायाचित्रण : संजय मेमाणे

संकलन : देवेंद्र मुर्डेश्वर

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here