स्टॉकहोम/वॉशिंग्टन: पंचेंद्रियांद्वारे माणसाला आसपासच्या परिस्थितीचे ज्ञान होते. माणसाच्या याच क्षमतेमुळे विविध प्रकारच्या प्रतिकूल स्थितीत टिकून राहण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. आपल्या शरीराच्या त्वचेवर असणाऱ्या संवेदकांच्या साह्याने उष्ण, थंड तापमान, तसेच विविध प्रकारच्या स्पर्शांबाबतची माहिती मज्जासंस्थेद्वारे मेंदूपर्यंत पोचवली जाते आणि त्याला अनुसरून आपल्याला वेदना जाणवतात. स्पर्शांबाबतची ही मूलभूत माहिती विज्ञानाला विसाव्या शतकापासूनच होती. मात्र, जनुकीय पातळीवर ही प्रक्रिया नेमकी कशी घडते याबाबतचे विश्लेषण यंदाच्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी केले आहे.

संशोधन नेमके काय?

डॉ. डेव्हिड ज्युलियस यांनी संवेदनांशी संबंधित मानवी डीएनएमधील लाखो जनुकांचा अभ्यास केला. या अभ्यासातून मिरचीमधील कॅप्सायसिन या उष्णता निर्माण करणाऱ्या रसायनाची जाणीव करून देणारे नेमके जनुक शोधून काढले. पुढील अभ्यासातून या जनुकाशी संबंधित विशिष्ट प्रथिन शोधण्यात डॉ. ज्युलियस यांना यश आले. हे प्रथिन म्हणजे मानवी पेशींमधील उष्णतेची जाणीव करून देणारा रिसेप्टर (टीआरपीव्ही १) असल्याचे त्यांनी सिद्ध केले. ज्युलियस आणि पॅटापौटीयान यांनी स्वतंत्रपणे मेंथॉल रसायनाचा वापर करून शीत तापमानाची जाणीव करून देणारा ‘टीआरपीएम ८’ हा रिसेप्टरही शोधला

औषधशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; डेव्हिड ज्युलिअस आणि अर्डेम पटापाउटियन यांचा सन्मान
रिसेप्टर आणि संवेदना

विविध प्रकारच्या पृष्ठभाग आणि वस्तूंना स्पर्श केल्यावर आपल्याला ती वस्तू कशी आहे हे स्पर्शाने समजते. मानवी त्वचेमध्ये असणारी ही क्षमता मानवी पेशींमधील ‘पियेझो-१’ आणि ‘पियेझो २’ या रिसेप्टरमुळे असल्याचे पॅटापौटीयान यांनी दाखवून दिले. पॅटापौटीयान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वप्रथम धक्का लागल्यानंतर विद्युत संदेश निर्माण करणाऱ्या पेशींना विलग केले. त्यानंतर यांत्रिक बलाची जाणीव करून देणाऱ्या जनुकांचा त्यांनी शोध घेतला. त्यांच्या या शोधातून पेशींच्या कवचाला धक्का लागल्यावर सक्रिय होणाऱ्या आणि आपल्याला स्पर्शाची जाणीव करून देणाऱ्या ‘आयन चॅनल’चे अस्तित्व सिद्ध झाले.

चीन सरकारकडून इंटरनेट कंपन्यांवर नियंत्रण; सांगितले ‘हे’ कारण!
ज्युलियस आणि पॅटापौटीयान यांच्या संशोधनामुळे स्पर्श आणि संवेदनांची मूलभूत प्रक्रिया नेमकेपणाने उलगडली आहे. विविध आजारांमधील तीव्र वेदनांचे शमन करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार असल्याचे नोबेल पारितोषिक निवड समितीचे म्हणणे आहे.

दोन्ही शास्त्रज्ञांची ओळख

डेव्हिड ज्युलियस : न्यूयॉर्क येथे १९५५ मध्ये जन्मलेल्या डॉ. ज्युलियस यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून १९८४ मध्ये पीएचडी मिळवली. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी त्यापुढील संशोधन केले. सध्या डॉ. ज्युलियस हे कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

आर्डम पॅटापौटीयान: बैरुत लेबॅनन येथे १९६७ मध्ये जन्मलेले डॉ. पॅटापौटीयान युद्धजन्य स्थितीमुळे अमेरिकेत स्थलांतरित झाले. १९९६ मध्ये त्यांनी कॅलटेक येथून पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. २००० सालापासून ते स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूट येथे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here