हायलाइट्स:
- लखीमपूर हिंसाचारात नऊ जणांचा बळी
- मंत्रीपुत्र आशिष मिश्र याच्यावर आरोप
- केंद्रीय मंत्र्यांकडून मुलाच्या बचावाचा प्रयत्न
घटनास्थळावर माझा मुलगा आशिष मिश्र उपस्थित होता, हे दर्शवणारा एकही व्हिडिओ दाखवला तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असं आव्हान खासदार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांनी दिलंय.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी हे विधान केलंय. ‘मी वारंवार माझी बाजू मांडतोय. मी किंवा माझा मुलगा घटनास्थळावर नव्हतो, हे दर्शवणारे पुरावे माझ्याजवळ आहेत. घटनास्थळी माझ्या मुलाच्या उपस्थितीचा एकही व्हिडिओ कुणी दाखवला तर मी आताच मंत्रीपदाचा राजीनामा देईन’ असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
आम्ही कोणत्याही चौकशी समितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. या घटनेला कारणीभूत असणाऱ्या कटकारस्थान रचणाऱ्यांना आणि आरोपींना सोडलं जाणार नाही. गाडीतून वाहनचालकाला बाहेर खेचून ठार मारण्यात आलं, हे व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येतंय. जर तिथे माझा मुलगा उपस्थित असतान तर त्याचीही हत्या झाली असती. एवढ्या मोठ्या गर्दीत कुणालाही गाडीखाली चिरडून घटनास्थळावरून पळ काढणं अशक्य आहे, असंही लखीमपूरचे खासदार अजय मिश्र टेनी यांनी म्हटलंय.
ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा आपण घटनास्थळी नसल्याचा दावा आशिष मिश्र यांनी केला आहे. जी महिंद्रा थार गाडी मी वापरतो त्यात कार्यकर्ते बसले होते. आम्हाला जी माहिती समजली त्यानुसार, या गाडीवर दगडफेक करण्यात आली. गाडीचा तोल गेला आणि त्यानंतर आमच्या चार कार्यकर्त्यांची मारहाण करत हत्या करण्यात आली, असा दावा आशिष मिश्र यांनी केलाय.
लखीमपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आशिष मिश्रसहीत १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times