: मुलगा आणि शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या मदतीने सासूने सुनेसह नातीचा निर्घृणपणे खून केल्याची घडना घडली होती. या खुनानंतर धडावेगळा केलेला सुनेचा मृतदेह तोळणूर ता. अक्कलकोट परिसरातील रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला होता. या गुन्ह्यातील मृत महिलेचा पती, सासू, शेजारीण आणि मदतगार रिक्षाचालक यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी दोषी ठरवलं असून त्यातील मृत महिलेचा पती, सासू व शेजारणीला जन्मठेप तर पुरावा नष्ट केल्यामुळे पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसंच रिक्षाचालकासही पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अक्कलकोट येथील घाडगे दूध डेअरीसमोरील संजय नगर झोपडपट्टीत रमजान मन्नू शेख याचा विवाह शहनाज हिच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी होती. मात्र, रमजान, त्याची आई अम्मा ऊर्फ रेणुका मन्नू शेख, शेजारीण शाहीन रहिमान शेख यांनी पाच वर्षांच्या चिमुकलीला ठार मारून त्या परिसरातील विकास हॉटेलजवळ टाकून दिले. त्यावरून त्यांच्या घरात वारंवार भांडणे सुरू झाली.

या भांडणातून रमजान, अम्मा व शाहीन या तिघांनी २ ऑगस्ट २०१८ रोजी शहनाजला जबर मारहाण केली. त्यात शहनाज जखमी होऊन बेशुद्ध पडली. मारहाणीत शहनाजचा मृत्यू झाला आणि त्यांनी शेजारील रिक्षावाला दिलदार तकदीरखा सौदागरला बोलावून आणले. मृत शहनाजला त्यांनी रिक्षातून अक्कलकोट सरकारी दवाखान्यासमोरील मोकळ्या मैदानात आणले. त्याठिकाणी आल्यानंतर शाहीनने तिचे दोन्ही पाय तर अम्माने दोन्ही हात पकडले आणि रमजानने एक्सा ब्लेडने शहनाजचे मुंडके धडावेगळे केले. त्यानंतर त्यांनी शहनाजचा मृतदेह पोत्यात भरून रमजानच्या दुचाकीवर ठेवला आणि शाहीनच्या मदतीने त्यांनी तोळणूर येथील रेल्वे रुळावर फेकला.

रेल्वे अपघात भासवण्यासाठी त्यांनी खटाटोप केला, परंतु पोलीस तपासात सत्य समोर आलं.

या घटनेची माहिती रेल्वे गेटमन म्हाळप्पा ढोणे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यास दिली होती. त्यानंतर सरकारतर्फे पोलीस हवालदार धनसिंग राठोड यांनी पोलिसांत रितसर फिर्याद दिली. पोलिसांनी कसून तपास केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा, आरोपींची कबुली यावर सरकारतर्फे ऍड. प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांना दोषी धरले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक व्ही.एस. जाधव यांनी केला तर कोर्टपैरवी म्हणून पोलीस हवालदार डी. कोळी यांची मदत झाली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here