पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सात ऑक्टोबरला प्रशासकीय कारकिर्दीची दोन दशके पूर्ण करीत आहेत. आजच बरोबर वीस वर्षांपूर्वी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या निमित्ताने केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचे मनोगत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा ते आमदारही नव्हते. आमदारकी सोडाच, पण त्याआधी ते एखाद्या गावचे सरपंच किंवा शहराचे महापौरही नव्हते. संघटनात्मक कामात स्वत:ला झोकून दिलेला हा माणूस थेट मुख्यमंत्रिपदी विराजमान झाला आणि त्यानंतर आजच्या तारखेपर्यंत जे घडले तो इतिहास जगापुढे आहे. इतका दीर्घकाळ प्रशासकीय प्रमुख म्हणून लोकशाही व्यवस्थेत कार्यरत राहण्याचा नरेंद्रभाईंचा द्विदशकी विक्रम अनोखा आहे. लोकशाही मार्गाने लोकांमधून स्वतः निवडून यायचे आणि लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचे प्रमुख व्हायचे, तेही अखंड वीस वर्षे ही बाब भारतासारख्या भाषिक, प्रांतिक, धार्मिक आदी कमालीचे वैविध्य असणाऱ्या देशात किती अवघड आहे ,हे मी सांगण्याची गरज नाही. नरेंद्रभाईंचे वेगळेपण असे की त्यांनी गुजरात सलग तीनदा बहुमताने जिंकले. त्यानंतर भारतासारख्या खंडप्राय देशातही सलग दोन निवडणुका वाढत्या लोकप्रियतेसह आणि वाढत्या संख्याबळाने जिंकल्या. लक्षात घेण्याची बाब अशी की नरेंद्रभाई दुसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधान झाले तत्पूर्वी सलग पस्तीस वर्षे या देशात एकाही पक्षाला बहुमत मिळवता आलेले नव्हते. ती कसरही नरेंद्रभाईंनी २०१९ मध्ये भरून काढली आणि भारतीय जनता पार्टीला, तीनशे पारचा पल्ला गाठून दिला. भाजपच्या आणि संघ परिवारातल्या लाखो निरागस कार्यकर्त्यांचे जसे हे यश आहे, तितकेच श्रेय नरेंद्रभाईंच्या अथक मेहनतीला आणि नेतृत्वाला द्यावे लागते.
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी शिरावर आली, तेव्हा त्याला भूकंपाची पार्श्वभूमी होती. २६ जानेवारी २००१ च्या सकाळी ७.९ रिश्टर स्केलच्या तीव्र भूकंपाने कच्छ-भूज हादरले होते. जीवितहानी आणि वित्तहानीचा प्रकोप एवढा होता की अनुभवी प्रशासकीचीही कसोटी लागावी. पण पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्री झालेल्या नरेंद्रभाईंचे नवखेपण या संकटात जराही दिसले नाही. या भूकंपानंतर कच्छ-भूजचा जो विकास त्यांनी घडवून आणला, त्यामुळे हा परिसर गुजरातचे खास पर्यटन स्थळ बनले. या वाळवंटात उभ राहिलेले हस्तकला, पारंपारिक मीनाकारी, धातूचे दागिने यांचे छोट-छोटे कारखाने निर्यातक्षम बनले. याच परिसरात मुंद्रा बंदराची उभारणी झाली जिथून आता प्रचंड आयात-निर्यात होते. कच्छच्या सफेद रेतीच्या वाळवंटाकडे कोणी फिरकत नसे. पण नरेंद्रभाईंनी रण उत्सव चालू करून देशी-विदेशी पर्यटकांना येथे खेचून आणले. ही नेतृत्वाची दूरदृष्टी आणि नावीन्यपूर्ण निर्णय अंमलात आणण्याची धडाडी असते. अगदी अलीकडे आपल्या कोकणात महापुराने केलेली वाताहत पाहता नरेंद्रभाईंचेच कच्छ-भूजमधील पुनर्वसन मॉडेल माझ्या मनात होते. माझ्या कोकणावर कोसळलेल्या महापुराच्या संकटातून विकासाची संधी निर्माण करण्यासाठी मी ताकद पणाला लावणार आहे.
गेली पन्नास वर्षे मी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात राजकारणात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेपर्यंतच्या अनेक निवडणुका पक्षासाठी लढवल्या, स्वत:ही लढलो. हा अनुभव पाठीशी असल्याने नरेंद्रभाईंच्या अथक, अखंड वीस वर्षांच्या प्रशासकीय प्रमुखपदाचे महत्त्व मी समजू शकतो. राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करताना २०१४ मध्ये प्रचाराचा जो झंझावत नरेंद्रभाईंनी निर्माण केला तो आर्श्चयकारक होता. देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतले प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ धोरण आखून बाजूला होत नाही. त्याची अंमलबाजवणी निर्धारित वेळेत यात जातीने लक्ष घालतात. दर महिन्याला सर्व राज्यांच्या सचिवांशी बोलून ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ प्रकल्पांचा आढावा घेत त्याला गती देणारे पंतप्रधान यापूर्वी देशाने कधी पाहिले नाहीत. आठ-आठ तास बैठकांमध्ये बसून कागदावरील धोरणांनुसार प्रत्यक्ष काम होते की नाही यावर करडी नजर ठेवणारे पंतप्रधान ‘ब्युरोक्रसी’ पहिल्यांदाच अनुभवते आहे. पंतप्रधान थकत नाहीत. त्यांची ऐकून घेण्याची क्षमता अचाट आहे.
जगाच्या पाठीवर सतत दौरे करून ‘ब्रँड इंडिया’ची नवी ओळख निर्माण केली. मोदींच्या नेतृत्वातला भारत कोणाच्या दबावाखाली येत नाही. निर्णय घेण्यात ते कधी कुचराई करत नाहीत. प्रश्न रेंगाळत ठेवणे त्यांना आवडत नाही. परिणामांची जबाबदारी स्वीकारून पुढे जाणारे हे नेतृत्व आहे. ‘काय होईल’ या शंकेने त्यांच्या निर्णयक्षमता मंदावत नाहीत. म्हणूनच पंचवीस-तीस वर्षे केवळ चर्चेच्या पातळीवर असणाऱ्या जीएसटीची अंमलबजावणी त्यांनी घडवून दाखवली. वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या कृषी, बँकिंग, आर्थिक क्षेत्रातील सुधारणांचे निर्णय त्यांनी घेतले. गेल्या सात वर्षांतील त्यांच्या प्रत्येक धोरणांचा केंद्रबिंदू महिला, गरीब आणि तरुण असल्याचे दिसेल. आठ कोटी महिलांना उज्ज्वला गॅसचा लाभ, दोन कोटी गरिबांना पंतप्रधान आवास योजनेतून थेट पैसे, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम, ज्यांना बँका कधी दारात घेत नव्हत्या , अशा ४५ कोटी सर्वसामान्यांचे बँकेत खाते अशा कित्येक बाबी सांगता येतील. ‘मुद्रा’ योजनेतून २४ कोटी लोकांना कर्ज मिळाले. ज्यात ७० टक्के महिला आहेत. ‘घर घर शौचालय’ योजनेची अनेकांनी खिल्ली उडवली . पण देशभरातल्या माताभगिनींनी आज याच योजनेबद्दल पंतप्रधानांना दुवा देत आहेत.
‘कॅप्टन लिडींग फ्रॉम द फ्रंट’ असे म्हटले जाते. सीमेवरील शत्रूच्या कुरबुरी असोत, मंगळयानाची मोहीम असो, करोनाची लढाई असो, अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट असो आमचे पंतप्रधान सैनिक, वैज्ञानिक, डॉक्टर्स-नर्स, शेतकरी अशा प्रत्येक घटकाच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा उत्साह वाढवत राहतात. दिवसातले किती तास ते काम करतात, याबद्दल तर विरोधकही जाहीरपणे त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळतात. देशात ४५ टक्के रोजगारनिर्मिती करणाऱ्या क्षेत्राच्या मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवताना पंतप्रधानांनी मला जाणीवपूर्वक सांगितले, “समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत सत्तेचे लाभ पोहोचवता यायला हवेत. गरीब महिला, तरूणांचे जीवनमान उंचावणारी कामगिरी तुमच्याकडून मला हवी आहे.” देशाच्या जीडीपीत दहा टक्के वाटा असणाऱ्या क्षेत्राचे मंत्रालय पंतप्रधानांनी माझ्याकडे फार अपेक्षेने दिले आहे. अहोरात्र ‘मिशन मोड’मध्ये असणाऱ्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळावी, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माझ्या पहिल्याच बैठकीनंतर पंतप्रधानांनी मला सांगितले होते, “प्रत्येक क्षण मोलाचा आहे. तो सत्कारणी लावण्यासाठी तुमचा अनुभव, शक्ती पणाला लावा. देशाची अपेक्षा पूर्ती आपल्याला करायची आहे.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times