हायलाइट्स:
- प्रशासनानं तातडीने लक्ष द्यावं!
- सावित्रीच्या लेकींना रात्री उशिरापर्यंत घरी येण्यासाठी एसटीच नाही
- वेळेवर मानव विकास मिशनच्या बसेस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल
यासाठी राज्य परिवहन महामंडळास वाहन खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिली जाते. जून २०१२ पासून ही योजना अंमलबजावणीस आली. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात वेळेवर मानव विकास मिशनच्या बसेस उपलब्ध होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत बसस्थानकावर सावित्रीच्या लेकींना बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. ही परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात समोर आली आहे.
एवढेच काय तर अहेरी आगारातून सोडण्यात येणाऱ्या मानव विकास मिशनच्या निळ्या बसेस मध्ये विध्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर प्रवासी वाहतूक होत असल्याने मुलींना शाळेला मुकावे लागत आहे.
याबाबत अहेरी आगाराच्या व्यवस्थापकांना विचारले असता त्यांनी लेखी तक्रार आल्यास विचार करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली. ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, अजूनपर्यंत राज्य परिवहन महामंडळाकडून नियमित बससेवा नसल्याने विद्यार्थिनींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे नियमित बससेवेची मागणी केली जात आहे.
अहेरी आगारात एकूण ८५ बसेस असून त्यापैकी ४२ बसेस या मानव विकास मिशनच्या निळ्या बसेस आहेत. ४ शिवशाई, २ स्लीपर, २ एशियाड, २२ एम एस बॉडी आणि १३ लाल बॉडीची बसेस आहेत. या सर्व बसेसच्या मेंटेनन्स करणाऱ्या यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मंजूर ७५ पदापैकी तब्बल ४६ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ २९ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर अहेरी आगारातील वाहनांच्या देखभालीचा भार असल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अहेरी उपविभागातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन बिघाडीचे प्रमाण वाढले आहे. योग्य मनुष्यबळ नसल्याने दर महिन्याला रिक्त पदे भरण्याची मागणी केली जात आहे. मात्र, याकडे अक्षरशा दुर्लक्ष होत असल्याने याचा परिणाम थेट शालेय विद्यार्थिनीवर होत असल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times