Shrikrishna.Kolhe@timesgroup.com ट्विट: hShrikrishnaKMT

पुणे : पोलिस निरीक्षक म्हणून पुण्यात बदली झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिला अधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यांचे प्रमुख बनविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या वेळी त्यांना लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पद मिळाले. गुन्हे शाखेच्या पथकाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक म्हणून काम करताना सर्वाधिक १३२ घरफोड्या उघडकीस आणल्याची कामगिरी त्यांनी केली.

ही ओळख आहे स्वारगेट विभागाचा कार्यभार सांभाळणाऱ्या सहायक पोलिस आयुक्त म्हणजे सुषमा चव्हाण यांची. ‘महिलांसाठी पोलिस दलात खूप चांगले वातावरण आहे. येथे काम करताना सरकारी कर्तव्य बजावताना समाजसेवाही करता येते. एखाद्यावर झालेला अन्याय दूर करता येतो. प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी पोलिस दल एक चांगली संधी आहे,’ असे सुषमा चव्हाण सांगतात.

पुणे शहर पोलिस दलातील चौकीच्या आणि पोलिस ठाण्याच्या पहिल्या प्रमुख, गुन्हे शाखेच्या पथकाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळलेल्या चव्हाण यांचे वडील सहायक पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. त्यामुळे घरात पोलिस खात्याचे वातावरण होते. फुटबॉलपटू असल्यामुळे दुसरीकडे नोकरीची संधी असतानाही त्यांनी पोलिस खाते निवडले. राज्य लोकसेवा आयोगाकडून पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत त्या १९८७मध्ये पहिल्यांदाच उत्तीर्ण झाल्या. पूर्वीच्या आयुक्तालयातील भोसरी पोलिस ठाण्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर पुणे शहर दलातील विविध विभाग, पोलिस ठाणे, मुंबई, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), विमानतळ सुरक्षा विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी अशा ठिकाणी त्यांनी काम केले.

‘पुणे शहर पोलिस दलात दाखल झाले, त्या वेळी महिला अधिकाऱ्यांची संख्या कमी होती. महिला अधिकाऱ्यांकडून कशा पद्धतीने काम करून घ्यावे, याची वरिष्ठांना जास्त कल्पना नव्हती. महिलाविषयक गुन्ह्यांत महत्त्वाची कामगिरी केल्याने वरिष्ठांनाही महिला अधिकाऱ्यांच्या कामाबाबत विश्वास निर्माण झाला. त्यानंतर १९८९मध्ये नारायण पेठ पोलिस चौकीचे प्रमुख म्हणून प्रथमच काम करण्याची संधी मिळाली,’ अशी आठवण सुषमा यांनी सांगितली.

२००७मध्ये पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व २०१० आणि २०२०मध्ये सुषमा यांना राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहे.

‘कुटुंब व कर्तव्य तारेवरचीच कसरत’
‘पोलिस दलात काम करताना कौटुंबिक जबाबदारी व कर्तव्य सांभाळताना नेहमीच कसरत करावी लागली. पोलिस दलात कामाच्या वेळा निश्चित नसल्यामुळे मुलाला जास्त वेळ देता येत नव्हता. सकाळी अर्धा तास फक्त त्याची भेट व्हायची. त्यांचे पती राज्य परिवहन महामंडळात अधिकारी आहेत. कुटुंबासाठी वेळ देताना अडचणी होत्या; पण कोणीच कधी तक्रार केली नाही. मुलगा आता ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहेत, याचा अभिमान वाटतो,’ असे सुषमा चव्हाण यांनी नमूद केले.

महिलांनी नेहमीच सजग राहिले पाहिजे. कोणी त्रास देत असेल, अन्याय करत असेल, तर शांत बसून सहन करू नका. त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करा. महिला सुरक्षेसाठी पुणे पोलिस दलात विविध उपक्रम राबविले जात आहेत.

– सुषमा चव्हाण,

सहायक पोलिस आयुक्त

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here