कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात (Kolhapur अंबाबाई मंदिर) शारदीय नवरात्रोत्सवास आज प्रारंभ झाला. टाळेबंदीमुळे बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी पहाटेपासून खुले झाले. मात्र दुपारच्या सुमारास अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली आणि शहरात एकच खळबळ उडाली. दीड तासाच्या तपासानंतर असा कोणताही प्रकार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. त्यामुळे पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. याबाबत तपास करण्यासाठी जवळपास दीड तास दर्शन बंद करण्यात आलं होतं. मात्र पोलिसांच्या तपासानंतर या परिसरात बॉम्ब नसल्याचं स्पष्ट झालं. बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणारा फोन कोणी केला होता आणि अशी अफवा पसरवण्यामागे सदर व्यक्तीचा काय हेतू होता? याबाबत पोलिसांकडून आता अधिक तपास केला जात आहे. कोल्हापूर: नरबळी प्रकरणाचे गूढ उकलले; जन्मदात्या बापानंच केलं ‘ते’ भयंकर कृत्य
दर्शनासाठी मंदिर आजपासूनच झाले खुले
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्यामुळे अंबाबाई मंदिरही आज पहाटेपासून भक्तांसाठी खुले झाले. ऑनलाईनवर नोंदणी करणाऱ्यांना देवीचे थेट दर्शन घेता येत आहे. तसंच ऑनलाईन बुकींग करणाऱ्या भाविकांना महाद्वारातून मुख दर्शनाची सोय केली आहे. गेले पंधरा दिवस नवरात्रोत्सवासाठी मंदिरात तयारी सुरू होती. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर झळाळून निघाले आहे.
ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यासाठी शिवाजी चौक आणि एमएलजी येथून सोडण्यात येत आहे. त्यासाठी बॅरिकेटस् लावण्यात आली आहेत. मुखदर्शनाच्या रांगेसाठी बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार या मार्गावर बॅरिकेटस् उभारण्यात आले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times