हायलाइट्स:
- उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हत्याकांड प्रकरण
- ‘मंत्रीपुत्र’ असलेल्या आरोपीला पोलिसांकडून संरक्षण?
- हत्येचा आरोप असूनही अटक दूरच, चौकशीही नाही
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या रविवारी (३ ऑक्टोबर) घडलेल्या हिंसाचार प्रकरणानंतर पहिल्यांदाच पोलीस आशिष मिश्रा याची चौकशी करणार आहेत. पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष मिश्रा याला समन्स जारी करण्यात आले आहेत. त्याला लकवरच चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्रा याच्यावर हत्या आणि बेजबाबदारपणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेनंतर चार दिवस उलटून गेल्यानंतरही या प्रकरणात मंत्रीपुत्राची अद्याप चौकशीही करण्यात आलेली नाही. ‘हिंसाचारानंतर शेतकऱ्यांशी चर्चा, त्यानंतर शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार या गोष्टींत व्यग्र असल्यानं या प्रकरणात अटक होऊ शकली नसल्याचं’ कारण यापूर्वी राज्यातील एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं समोर केलं होतं.
पोलिसांनी दाखवलेल्या निष्क्रीयतेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी या हायप्रोफाईल प्रकरणात ‘आरोपीला संरक्षण‘ देण्याचा आरोप केला आहे.
तांत्रिक पुराव्यांना फेटाळलं जाऊ शकत नाही, असं सांगतानाच या प्रकरणात दोषींना सोडलं जाणार नाही, असं आश्वासन उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिलं होतं.
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. ज्या गाडीखाली चार शेतकऱ्यांचा चिरडून मृत्यू झाला ती गाडी आपलीच होती, अशी कबुली अजय मिश्रा यांनी दिली. परंतु, आपण किंवा आपला मुलगा आशिष घटनास्थळी नव्हतो, असा दावाही त्यांनी केला होता. रविवारी घडलेल्या हिंसाचारात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला होता. यात चार शेतकरी, तीन भाजप कार्यकर्ते, एक ड्रायव्हर आणि एका पत्रकाराचा समावेश होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times