हायलाइट्स:

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यभर पदयात्रा
  • केंद्र व राज्य सरकारवर राजू शेट्टी यांचा निशाणा
  • दसऱ्याच्या दिवशी या यात्रेचा शेवट होणार

कोल्हापूर : ‘घटाची स्थापना करून खऱ्या अर्थाने सत्य आणि असत्याची लढाई सुरू होते. विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी सत्याचा विजय होतो. यामुळे एफआरपीच्या लढाईत आमचा विजय होईल, एकरकमी एफआरपी नक्की मिळेल,’ असा विश्वास माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर पदयात्रा सुरू केली आहे. एकरक्कमी एफआरपी देण्याची सुबुद्धी केंद्र व राज्य सरकारला द्यावी आणि यासाठी करण्यात येणाऱ्या संघर्षाला सर्व शक्तीपीठांनी शक्ती द्यावी, असं दख्खनचा राजा जोतिबाला साकडे घालून आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘जागर एफआरपीचा व आराधना शक्तीपीठांची’ या यात्रेस सुरुवात केली. त्यावेळी शेट्टी बोलत होते.

Aryan Khan: आर्यन खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; NCBची ‘ती’ विनंती कोर्टाने फेटाळली

केंद्र सरकारच्या नीती आयोग व कृषीमुल्य आयोगाने एफ.आर.पी तीन टप्यात देण्यासंदर्भात शिफारस केली आहे. यांबाबत देशातील १५ राज्यांकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने तीन टप्यात एफआरपीला पाठिंबा दिला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सुबुद्धी येऊ दे, यासाठी राज्यातील सर्व शक्तीपीठांना साकडं घालून आराधना करण्यात येणार आहे. यासाठी ही पदयात्रा गुरुवारी सुरू करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आजपासून जोतिबा येथून सुरुवात झालेली ही यात्रा कोल्हापूर , सांगली , सोलापूर , तुळजापूर , अहमदनगर , औरंगाबाद , नाशिक , पुणे व सातारा जिल्ह्यातील शक्तीपीठांना साकडे घालून दसऱ्याच्या दिवशी या यात्रेचा शेवट होणार आहे.

दरम्यान, यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, सावकर मादनाईक, जयकुमार कोले, वैभव कांबळे, जनार्दन पाटी , विठ्ठल मोरे, संदीप कारंडे, राजेश पाटील, राम शिंदे यांच्यासह स्वाभिमानीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here