हायलाइट्स:
- भारत – चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेचा वाद
- भारतीय सैनिकांनी जवळपास २०० चिनी सैनिकांना रोखलं
- कमांडर स्तरावरच्या चर्चेनंतर वाद मिटला
ही घटना गेल्या आठवड्यात घडलीय. भारत आणि चीनचे सैनिक पेट्रोलिंग दरम्यान एकमेकांना जवळपास भिडले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशात यांगत्सेजवळ तवांग सेक्टरमध्ये गेल्या आठवड्यात भारतीय सैनिकांनी चीनच्या जवळपास २०० सैनिकांना रोखलं.
भारतीय सेनेच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चिनी सैनिक वास्तविक नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सीमेत घुसले होते.
भारत चीनची वास्तविक नियंत्रण रेषा
संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भारत – चीन सीमेवर औपचारिकरित्या सीमा निश्चित करण्यात आलेली नाही. दोन्ही देशांची सीमा रेषा वैयक्तिक आकलनावर आधारीत आहे आणि दोन्ही देशांच्या आकलनात फरक आहे. त्यामुळे या भागात वारंवार अशा घटना घडून येऊ शकतात. दोन्ही देश आपआपल्या धारणेनुसार सीमेवर टेहळणी करतात. दोन्ही देशांदरम्यान कोणत्याही प्रकारची असहमती दिसली तर ‘प्रोटोकॉल’नुसार त्यावर शांतिपूर्ण मार्गानं चर्चेतून उत्तर काढलं जातं. गेल्या आठवड्यात ही घटना घडली असली तर सीमेवर शांती कायम असल्याचंही संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटलंय.
उत्तराखंडातही तणाव
या अगोदर ३० ऑगस्ट रोजी उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चीनच्या जवळपास १०० सैनिकांनी सीमा रेषा पार करून भारतीय क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय सीमेपासून जवळपास पाच किलोमीटर भारतीय हद्दीत येऊन पूल उद्ध्वस्त करून चीनी सैनिक परतले होते, अशी माहिती समोर आली होती. परंतु, सुरक्षा यंत्रणेनं हा दावा फेटाळून लावला होता.
लडाख भागात दीड वर्षांपासून तणाव
पूर्व लडाख भागात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून भारत आणि चीन सीमेवर तणाव दिसून येतोय. दोन्ही देशांदरम्यानच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी या भागात सतत सैन्य स्तरावर चर्चा सुरू आहे. या भागात एलएसीवर चिनी सैनिकांनी आपली संख्याही वाढवल्याचं समोर आलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times