हायलाइट्स:
- भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वरुण गांधी यांना वगळलं
- काँग्रेसकडून वरुण गांधी यांना डिवचण्याचा प्रयत्न
- वरुण गांधींनी ट्विटरवर लढाई सोडून रस्त्यावर उतरावं : अलका लांबा
भाजप नेते वरुण गांधी शेतकऱ्यांप्रती असलेल्या आपल्या प्रतिबद्धतेबद्दल प्रामाणिक असतील तर त्यांनी तत्काळ भाजपमधून बाहेर पडत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरायला हवं, असं काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी म्हटलंय.
‘मी वरुण गांधी यांना सल्ला देऊ इच्छिते की, जर त्यांच्यात अजूनही थोडाही स्वाभिमान शिल्लक असेल आणि ते लखीमपूर खीरीमध्ये चिरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांप्रती आपल्या लढाईवर ठाम असतील तर त्यांनी ट्विटरवर लढाई सोडून रस्त्यावर उतरायला हवं. भाजपमधून तत्काळ बाहेर पडून वरुण गांधी यांनी आपला आवाज उंचवायला हवा’, असा सल्लाही अलका लांबा यांनी पत्रकारांशी बोलताना वरुण गांधी यांना दिलाय.
वरुण गांधींना काँग्रेसकडून आमंत्रण?
वरुण गांधी यांना अजूनही असं वाटत असेल की मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना जागा मिळेल तर ते चुकीचे आहेत. त्यांनी आताच याबद्दल निर्णय घ्यायला हवा, असंही लांबा यांनी म्हटलंय.
भाजप सोडून वरुण गांधी यांना काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं जाणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ‘मी त्यांना कोणतंही निमंत्रण दिलेलं नाही, हा केवळ वरुण गांधी यांचा निर्णय असेल’ असं लांबा यांनी स्पष्ट केलंय.
वरुण गांधी यांचं ट्विट
रविवारी लखीमपूर हिंसाचारानंतर वरुण गांधी यांनी या हिंसाचाराशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विट केला होता. या व्हिडिओत भाजप नेत्याची गाडी शेतकऱ्यांना चिरडून पुढे गेलेली दिसत होती. ‘व्हिडिओ अतिशय स्पष्ट आहे. आंदोलनकर्त्यांची हत्या करून त्यांना गप्प केलं जाऊ शकत नाही. निर्दोष शेतकऱ्यांच्या हत्येसाठी जबाबदारी निश्चित करायला हवी. अहंकार आणि क्रूरतेचे विचार शेतकऱ्यांच्या मनात येण्यापूर्वीच त्यांना न्याय द्यायला हवा’ असं वरुण गांधी यांनी म्हटलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, प्रत्यक्षदर्शी आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, ज्या वाहनानं शेतकऱ्यांना चिरडलं ती गाडी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा चालवत होता. घटनेनंतर पाच दिवस उलटल्यानंतरही अद्याप हत्येचा आरोपी आशिष मिश्रा याची चौकशीही होऊ शकलेली नाही, हे विशेष.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times