औरंगाबाद: औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगीत, अंबडला अवकाळी पावसाने दणका दिला आहे. औरंगाबाद शहरातही पाऊस सुरू झाला आहे. वाळूज, सिल्लोडसह जवळपासच्या संपूर्ण परिसरात पाऊस धडकला असून या पावसाने बळीराजा धास्तावला आहे. एकीकडे शेतकरी कर्जमाफीचा दिलासा मिळत असताना अवकाळी पावसाचे संकट बळीराजाच्या दारात उभे ठाकले आहे.

जालन्यातील घनसावंगी, अंबड, बदनापूर, भोकरदन आणि जालना शहर व औद्योगिक वसाहत परिसरात शनिवारी रात्री ९:४५ च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अंबड शहर व परिसरातील गावात तसेच घनसावंगी परिसरात सुमारे दहा मिनिटे जोरदार पाऊस झाला तर याच सुमारास बदनापूर आणि जालन्यातील औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या औद्योगिक वसाहत क्षेत्रात रिमझिम पाऊस झाला. नवीन जालन्यात रात्री १०:३० नंतर पाऊस झाला यावेळी वीजपुरवठा खंडित झाला.

रात्री ९ वाजेच्या सुमारास आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि थंड हवा सुटली आणि काही वेळातच पावसाने हजेरी लावली. जालना शहरात आकाशात विजा चमकत होत्या. आंबा आणि द्राक्ष बागेतील आलेल्या मोहरावर या पावसामुळे परिणाम होऊ शकतो. मोहर गळतीचे प्रमाण वाढेल असे सांगितले जात आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देडगाव येथे हलक्या गारासह मध्यम स्वरुपाचा पाउस झाला आहे. तसेच इतर ३ ते ४ गावांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here