हायलाइट्स:
- पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
- सरकारच्या मदतीबाबत शेतकरी नेत्यांची नाराजी
- राजू शेट्टींनी केली आक्रमक शब्दांत टीका
‘मी आधीपासूनच सांगत होतो की हे सरकार शेतकऱ्यांना प्रतिगुंठा १३५ रुपये एवढीच नुकसान भरपाई देऊ करत आहे. मात्र त्यावेळी सरकारमधील अनेक मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांनीही हे खोटं आहे, असं म्हटलं होतं. स्वत: मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की माझ्यावर विश्वास ठेवा, २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणेच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. पण आता मुख्यमंत्री त्यांचा शब्द फिरवत आहे. सरकारकडे पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं,’ अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
पूरग्रस्तांना योग्य मदत न देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला याची किंमती चुकवावी लागेल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.
‘राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारने २०१९ प्रमाणे मदत करू, असं आश्वासन दिलं. मात्र आता हे आश्वासन न पाळणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे,’ असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कुरूंदवाड ता. शिरोळ येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळून सरकारचा निषेध करण्यात आला आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारकडून आपल्या निर्णयाचा पुनर्विचार केला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times