हायलाइट्स:
- दोन नोटिशीनंतर अखेर आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर
- क्राईम ब्रान्च कार्यालयात आरोपीची चौकशी सुरू
- लखीमपूरमध्ये इंटरनेट सेवा शुक्रवार सायंकाळपासून बंद
यापूर्वी, आशिष मिश्रा याला शुक्रवारी सकाळी १०.०० वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. परंतु, आरोपीनं वेळ मागितल्यानंतर त्याला आज सकाळी ११.०० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपायच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच आज (शनिवारी) सकाळी १०.३८ वाजता आशिष मिश्रा क्राईम ब्रान्चच्या कार्यालयात दाखल झाला.
घटनेनंतर तब्बल ६ दिवसांनी आरोपी आशिष मिश्रा पहिल्यांदाच पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत ‘हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीला प्लीज चौकशीसाठी या’ अशी विनंती केली जाते का? असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश पोलिसांना खडसावलं होतं.
यापूर्वी, आम्ही नोटिशीचा सन्मान करून तपासात सहकार्य करणार आहोत, आशिष मिश्रा आज पोलिसांसमोर हजर होईल, असं त्याचे कायदेशीर सल्लागार अवधेश कुमार यांनी म्हटलं होतं.
आशिष मिश्रासाठी क्राईम ब्रान्चनं ३२ प्रश्नांची एक यादी तयार केलीय. त्याच्या चौकशीची व्हिडिओग्राफीदेखील केली जाणार आहे.
लखीमपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद
दुसरीकडे, भाजप कार्यालयात समर्थक गोळा होण्यास सुरुवात झालीय. आशिष मिश्रा निर्दोष असल्याचं भाजप समर्थकांचं म्हणणं आहे. ‘आम्हाला माहीत आहे की तो निर्षोष आहे. घटना घडली तेव्हा आशिष घटनास्थळी नव्हता. त्याला केवळ चौकशीसाठी बोलावण्यात आलंय’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी दिलीय.
दरम्यान, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता शुक्रवारी सायंकाळपासून पुन्हा एकदा लखीमपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times