नागपूर: ‘कुठल्याही विशिष्ट समुदायाला धर्मावर आधारित आरक्षण मिळू देणार नाही. त्यासाठी न्यायपालिकेपासून रस्त्यापर्यंतची लढाई लढण्यात येईल,’असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त प्रांतमंत्री डॉ. जैन यांनी शनिवारी चिटणीस पार्क येथे केले. बजरंग दलच्या प्रांत अधिवेशनादरम्यान आयोजित स्पर्धेत ते बोलत होते.

राज्यात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने या आरक्षणाला होकार दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना जैन म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केवळ सत्तेपोटी ही लाचारी पत्करली आहे. हिंमत असेल तर त्यांनी राज्यातील घुसखोर बांगलादेशींना बाहेर काढून दाखवावे. त्या कार्यात त्यांना बजरंग दलदेखील साथ देईल. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह संपूर्ण जनतेच्या विश्वासाला तडा दिला आहे. उद्धव ठाकरेंकडून याप्रकारच्या कृत्याची अपेक्षा नव्हती.’

वर्तमान स्थितीवर बोलताना जैन यांनी सीएएला विरोध करणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला. ‘देशात कलम ३७० रद्द झाले, राम मंदिर निर्माण होत आहे, तिहेरी तलाक बंद झाला आहे. या सर्व गोष्टींचा राग कुठेतरी होता तो सीएएच्या विरोधातून दिसत आहे. महिलांना प्रत्येकी पाचशे रुपये देऊन शाहीनबागसारखे प्रकरण घडविण्यात येत आहे. देशाबाहेरील आणि आतील शक्तींनी आता हिंदू समाजाला कमजोर समजू नये. तो पूर्वीसारखा कमकुवत राहिलेला नाही. सक्षमपणे प्रत्युत्तर देण्यास तो तयार आहे. हिंदू त्यांच्या देवी-देवतांचा, आई-बहिणींचा अपमान सहन करणार नाही’, असे जैन यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here