वृत्तसंस्था, रियाध
विषाणूमुळे भयावह स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियाने ‘गल्फ को ऑपरेशन कौन्सिल’चे (जीसीसी) सदस्य असलेल्या देशांमधील नागरिकांना व या पवित्र शहरांमध्ये प्रवेशास बंदी घातली आहे.
दोनच दिवसांपूर्वी सौदीने ‘उमराह’ यात्रेसाठीचे व्हिसा रद्द करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला होता. त्यामुळे जुलैमध्ये होऊ घातलेल्या हज यात्रेबाबतही अनिश्चितता निर्माण झाली होती. करोनाचा फैलाव असलेल्या देशांमधील पर्यटकांचे व्हिसाही स्थगित करण्यात आले होते.
‘जीसीसी’मध्ये सौदी अरेबियासह संयुक्त अरब अमिराती, बहरिन, कुवेत, ओमान आणि कतार या सहा देशांचा समावेश होतो. सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात प्रवेशबंदीचा निर्णय सौदीच्या नागरिकांना लागू आहे का, याबाबत स्पष्टता नाही. मात्र सलग १४ दिवस सौदीमध्येच असलेल्या आणि करोनाची लक्षणे नसलेल्या ‘जीसीसी’ सदस्य देशांच्या नागरिकांना यातून वगळल्याचे सांगितले जाते.
सौदीमध्ये अद्याप करोनाचा रुग्ण सापडला नसला, तरी कुवेत, बहरिन आणि संयुक्त अरब अमिरातींसह शेजारी देशांमध्ये करोनाचा फैलाव झाल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. सामान्यत: ‘जीसीसी’ सदस्य देशांतील नागरिकांना त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्रासह सौदीमध्ये प्रवेश करता येतो, मात्र गुरुवारच्या निर्णयानुसार आता पासपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे.
गंभीर परिणामांचा इशारा
सेउल : देशभरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या करोना विषाणूला रोखण्यासाठी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच तंबी दिली आहे. उत्तर कोरियात होणारा ‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी अपयशी ठरल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा किम जोंग यांनी दिला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
किम जोंग यांनी त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. ‘करोना’पासून देशातील लोकांचे रक्षण करणे, हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी अधिकाधिक शिस्त पाळणे गरजेचे आहे, असे जोंग यांनी सांगितल्याची माहिती कोरियाच्या वृत्तसंस्थेने दिली आहे.
उत्तर कोरियाने पर्यटकांवर बंदी घातली असून, आंतरराष्ट्रीय रेल्वे आणि विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. परदेशातून कोरियात आलेल्या शेकडो पर्यटकांना वेगळे ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, दक्षिण कोरियामध्ये शनिवारी करोनाचे नवे ८१३ रुग्ण आढळले असून, यासह करोना बाधितांची येथील संख्या ३,१५०वर गेली आहे. आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या देशांमध्ये दक्षिण कोरिया आघाडीवर आहे.
अमेरिकेत करोनाचा चौथा रुग्ण
वॉशिंग्टन : अमेरिकेत करोनाचा चौथा रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. वॉशिंग्टनमध्ये एक अल्पवयीन मुलाला करोनाचा ‘संभाव्य संसर्ग’ झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा मुलगा ज्या शाळेत शिकतो, ती शाळा तीन मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अमेरिकेत मात्र औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. मात्र, नक्की कोणती औषधे आणि त्यांचे निर्माते कोण, याबाबत मात्र अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मूलभूत औषधांचा तुटवडा भासत असला, तरी पर्यायी औषधांची व्यवस्था मात्र करण्यात आली आहे, असे अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
चीनमध्ये मृतांची संख्या २,८३५
बीजिंग : चीनमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याने आणखी ४७ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता २,८३५ झाली आहे; तसेच, करोना बाधितांची संख्या ७९ हजार २५१वर पोहोचली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ४२७ रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. ४७ मृतांपैकी ४५ जण हुबेई प्रांतातील असून, बीजिंग व हेननमधील प्रत्येकी एका जण आहे.
इराणमध्ये ४३ जणांचा मृत्यू
दुबई : इराणमध्ये करोना विषाणूमुळे आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला असून, बाधितांची संख्या ५९३वर गेली आहे. चीननंतर ‘करोना’च्या संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू इराणमध्ये झाले आहेत. इराणचे सरकारी प्रवक्ते कियांउश जहांपुर यांनी ही माहिती दिली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times