हायलाइट्स:
- एकनाथ खडसे यांचे भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप
- गिरीश महाजन यांनी दिलं उत्तर
- खडसेंच्या पराभवाबाबत केला नवा दावा
‘एकनाथ खडसे हे अनेकदा विधानसभा निवडणुकीत अगदी कमी मतांनी निवडून आले आहेत. त्यांची निवडून येण्याची क्षमता संपली होती. त्यामुळे ते पराभूत झाले. मात्र आता दोन वर्षानंतर त्यांच्या पराभवाचे कारण मी असल्याचे ते सांगत असून हे हास्यास्पदच आहे,’ असा पलटवार गिरीश महाजन यांनी रविवारी नाशिकमध्ये केला आहे. भाजपच्या ओबीसी जागर अभियानाच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते.
ओबीसी जागर अभियानाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावा आज नाशिक येथे पार पडला. यावेळी आरक्षण प्रश्नावरून भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली.
‘ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झालं आहे. ठाकरे सरकारने ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय केला आहे. अजूनही हे सरकार आरक्षणासाठी आवश्यक असं पाऊल उचलताना दिसत नाही. ठाकरे सरकारच्या या वेळकाढू धोरणामुळे ओबीसी समाजाला याचा मोठा फटका बसत आहे,’ असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपच्या या मेळाव्याला गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार योगेश टिळेकर, ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. हंसराज अहिर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, आ. संजय कुटे आ. जयकुमार रावल, माजी आ. राम शिंदे, आ. देवयानीताई फरांदे, आ. राहुल ढिकले, माजी आ. बाळासाहेब सानप यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ओबीसी बांधव उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times