म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तत्त्वांशी तडजोड करणाऱ्या शिवसेनेचे बेगडी आहे. वेळेप्रसंगी सत्ता सोडणारी, पण तत्त्वांपासून दूर न जाणारी भाजपच शहराचे रक्षण व विकास करेल, असा दावा शनिवारी प्रदेशाध्यक्ष यांनी केला. ते मॅनोर लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

मेळाव्याला प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, भाजप नेत्या विजया रहाटकर, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर, डॉ. भागवत कराड, शिरीष बोराळकर, जयसिंगराव गायकवाड, शहराध्यक्ष संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, श्रीकांत जोशी, अनिल मकरिये, प्रमोद राठोड, बसवराज मंगरुळे, ज्ञानोबा मुंडे, प्रवीण घुगे उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यावेळी बोलताना शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. हिंमत असेल तर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी न करता या निवडणूक रिंगणात स्वतंत्र उतरावे. मुसलमानांचे लाड करणारे आणि स्वा. सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांसोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसणारी शिवसेना शहराचे काय संरक्षण करणार, असा सवाल करत आमचे राज्य गेले तरी चालेल. मात्र, आम्ही तत्त्वांशी तडजोड करणार नाही. भाजपच शहराचे संरक्षण व विकास करेल. येथील महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा महापौर आहे. त्यांनी एक तरी मोठा प्रकल्प आणल्याचे दाखवावे, असे आव्हान पाटील यांनी दिले. मेळाव्याला झालेली गर्दी पाहून पाटील म्हणाले की, हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे की विजय मेळावा हेच कळत नाही. निवडणुकीत विजय निश्चित आहे, पण आपण काय करणार हे जनतेपर्यंत सांगा. रस्ते, पाणी हे सर्व विकासकामे तर करणारच, पण त्याचबरोबर वृद्धासाठी मोफत बस, महिलांसाठी सर्वत्र स्वच्छतागृह यासह काय कामे करणार याचा पाढा त्यांनी वाचला. निवडणुकीत पराभूत झालोच तर विरोधक म्हणून काम करताना सीएसआर फंडातून कामे करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी आमदार बागडे, सावे, रहाटकर, शहराध्यक्ष केणेकर यांच्यासह अन्य नेत्यांनीही आपल्या भाषणातून शिवसेनेवर जोरदार टीका केली. दरम्यान, व्यासपीठामागे लावलेल्या पोस्टरवर प्रदेशाध्यक्षासह अन्य पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र होती. मात्र, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व आमदार बागडे यांची छायाचित्र नव्हती. ही बाब लक्षात येता ऐनवेळी धावपळ करून नवीन पोस्टर लावण्यात आले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिवसभरात कोअर कमिटी तसेच प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या समवेत बैठक घेतल्यानंतर काही भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर सायंकाळी उद्योग, व्यापार, बांधकामसह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी एका हॉटेलमध्ये संवाद साधला. यात या मान्यवरांच्या शहराच्या विकासासाठी असलेले प्रस्ताव, संकल्पना पाटील यांनी समजून घेतल्या. यात प्रामुख्याने रस्ते, पाणी यासह पायाभूत सुविधावर भर द्या, चांगले हॉस्पिटल, दळणवळणाचे प्रश्न, आंतरराष्टीय विमानसेवा असावी, यासह अन्य मुद्दे मान्यवरांनी मांडले. तर त्यास उत्तर देताना पाटील यांनी हे सर्व मुद्दे जाहीरनामा तयार करताना कामी येईल, असे सांगत संधी द्या शहराचा विकास करू, असे आश्वासन दिले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here