तैपेई: चीनसोबत एकीकरण करण्यासाठी वाढत्या दबावापासून तैवानचे संरक्षण करणार असल्याचे या देशाच्या अध्यक्ष त्साई इंग वेन यांनी सांगितले. तैवान आणि चीनमध्ये गेल्या आठवडाभरापासून तणाव निर्माण झाला असून, त्या पार्श्वभूमीवर त्साई यांनी हे वक्तव्य केले. तैवानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित संचलनात तैवानने लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले. चीनच्या लष्करी धमक्यांना प्रतिकार करणार असल्याचेही अध्यक्ष त्साई या वेळी म्हणाल्या. जैसे थे स्थिती कायम राहण्यासाठी आम्ही सर्व काही करू, असेही त्यांनी नमूद केले. ‘चीनने आमच्यासाठी जो मार्ग आखून ठेवला आहे, त्यावर जाण्यासाठी आम्हाला बळजबरी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करू,’ असेही त्यांनी सांगितले.

तैवान हे बेट आपल्या प्रदेशाचा भाग असल्यचा दावा चीनने केला आहे. मात्र, दीर्घ काळ चाललेल्या यादवी युद्धानंतर १९४९पासून चीनपासून वेगळे झाल्यानंतर तैवानचा कारभार स्वतंत्रपणे सुरू आहे. ‘तैवानमधील लोकशाही ही चीनमधील एकपक्षीय कम्युनिस्ट राज्याच्या एकाधिकारशाहीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे,’ असे अध्यक्ष त्साई म्हणाल्या. ‘चीनने दिलेला प्रस्ताव तैवानसाठी मुक्त आणि लोकशाही मार्गाचा नाही, तसेच आमच्या दोन कोटी ३० लाख लोकांचे सार्वभौमत्व राखणाराही नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

तैवान आमचा अंतर्गत मुद्दा, इतरांनी लुडबूड करू नये; चीनची धमकी
तैवानची राजधानी तैपेईमधील अध्यक्षीय कार्यालयासमोर राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तैवानमधील विविध आदिवासी समाजांतील गायकांच्या समूह गायनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तैवानी नागरिकांना स्वतंत्र देशाचा दर्जा कायम हवा असून, चीनसोबत एकीकरणाला प्रखर प्रखर विरोध होत असल्याचे सर्वेक्षणांतून समोर आले आहे. चीनने तैवान ताब्यात घेणार असल्याचे म्हटले असून, त्यासाठी गरज पडल्यास लष्करी ताकदीचा वापरही केला जाईल, असे जाहीर केले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकतेच तैवानसोबत एकीकरण होईलच, तसेच हे एकीकरण शांततामय मार्गाने होईल, असे सांगितले होते.

आमच्या देशावर हल्ला केल्यास आशियाचा विनाश होईल; चीनला ‘या’ देशाचा इशारा
तणावाची पार्श्वभूमी काय?

चीनने गेल्या वर्षी सप्टेंबरपासून आठशे वेळा लढाऊ विमाने तैवानच्या हवाई हद्दीजवळ पाठवली आहेत. गेल्या शुक्रवारपासून मोठ्या संख्येने चिनी लढाऊ विमाने तैवानच्या आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीजवळ पाठवण्यात आली होती. चीनच्या लष्करी धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तैवानने जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेशी सहकार्य वाढवले आहे. तैवानने आपल्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित संचलनात लष्करी शक्तिचे प्रदर्शन केले. मिसाइल लाँचर, चिलखती वाहने, लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर, सीएम ३२ रणगाडे, क्षेपणास्त्र यंत्रणांचा यात समावेश होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here