हायलाइट्स:

  • निकोटीनयुक्त हुक्का प्लेवरचा मोठा साठा जप्त
  • गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटची कारवाई
  • कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार

ठाणे : राज्यात प्रतिबंधित असलेला तब्बल ९ कोटी ३६ लाखांचा निकोटीनयुक्त हुक्का प्लेवरचा मोठा साठा ठाणे गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटने भिवंडीमधून जप्त केला आहे. या हुक्का फ्लेवरचे उत्पादन आणि निर्यात मुंबईतील एक कंपनी करत असून बेकायदेशीरपणे हुक्का फ्लेवर मुंबई, ठाणे, भिवंडीसह राज्यातील इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत असल्याची बाब गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीमधून समोर आली आहे.

भिवंडीतील धामणकर नाका येथील अल्ताफ अत्तरवाला या दुकानावर भिवंडी युनिटने नुकताच छापा टाकला होता. या कारवाईमध्ये प्रतिबंधित हुक्क्याचे वेगवेगळ्या प्रकारचे ८ हजार ९४० रुपयांचे ५७ फ्लेवर जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, गुन्हे शाखेने नुकताच भिवंडीतून मोठ्या प्रमाणावर हुक्का फ्लेवरचा साठा जप्त केला.

Kiran Gosavi: आर्यनला पकडून नेणारा किरण गोसावी गोत्यात; फसवणुकीचं नवं प्रकरण उघड

दापोडा गावातील हरिहर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मुंबईतील एका कंपनीच्या गोदामावर छापा टाकला. या गोदामात प्रतिबंधित निकोटीनयुक्त दोन वेगवेगळ्या प्रकारचे हुक्का फ्लेवरचा साठा आढळून आला. एका हुक्का फ्लेवर साठ्याची किंमत ८ कोटी ४२ लाख ४९ हजार ६१० रुपये (२८६२ बॉक्स) तर दुसऱ्या हर्बल फ्लेवरच्या साठ्याची किंमत ९४ लाख २८ हजार ९१० रुपये (३७५ बॉक्स) आहे. असा एकूण ९ कोटी ३६ लाख ७८ हजार ५२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे हुक्का फ्लेवर मुंबईतील नरिमन पॉईंट येथे असलेल्या एका कंपनीकडून उत्पादित आणि निर्यात केला जात आहे. हा हुक्का फ्लेवर भिवंडीतील गोदामातून बेकायदा विक्री केला जात असून यातील एक हुक्का फ्लेवर मुंबई, ठाणे, भिवंडी परिसरासह राज्यामध्ये इतरही ठिकाणी विक्री होत असल्याचे गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालं आहे.

दरम्यान, जप्त केलेल्या हुक्का फ्लेवरबाबत गुन्हे शाखा सखोल तपास करत असून बेकायदेशीर साठा केलेल्या कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here