इस्लामाबाद: मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानी जनतेला महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईमुळे अनेक कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे. महागाईच्या आगीत जनता होरपळत असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य पाकिस्तानच्या मंत्र्याने केले आहे. महागाईपासून दूर राहण्यासाठी लोकांनी कमी खाण्याचा सल्ला या मंत्र्याने दिला आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानच्या प्रकरणाचे मंत्री अली अमीन गंडापूर यांनी केलेले हे वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे.

एका सभेला संबोधित करताना अली अमीन यांनी, महागाईच्या वादावर बोलताना राष्ट्रवादाची आसरा घेत लोकांना म्हटले की, चहामध्ये मी दोनशे दाणे टाकतो. त्यापैकी काही दाणे कमी टाकले तर चहातला गोडवा कमी होणार नाही. देशासाठी स्वत:च्या आत्मनिर्भरतेसाठी एवढेही बलिदान देऊ शकत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला.

मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी गव्हाचे पीठ आणि इतर खाद्यान्नांची टंचाई निर्माण झाली होती.

पाकिस्तानच्या नागरिकांना कमी खाण्याचा सल्ला याआधीही देण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी १९९८ मध्ये अण्वस्त्र चाचणी केली होती. त्यावेळी पाश्चिमात्य देशांकडून पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लावण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी नवाझ शरिफ यांनी रेडिओवरून पाकिस्तानला संबोधित करताना एक वेळच जेवण्याची तयारी ठेवावी असे आवाहन केले होते.

आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानची परिस्थिती चिंताजनक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनेदेखील पाकिस्तानमधील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कौतुक केले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here