नवी दिल्ली : भारतानं करोना लसीकरण मोहिमेत आज आणखीन एक महत्त्वाचा आणि उल्लेखनीय टप्पा गाठलाय. २ ते १८ वर्षांच्या अल्पवयीन मुलांसाठी ‘भारत बायोटेक‘च्या ‘कोवॅक्सिन‘ लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे, आता देशात अल्पवयीन मुलांना करोना लस देणं शक्य होणार आहे.

याआधी, लहान मुलांवर या लशीच्या वापराला तज्ज्ञांकडून हिरवा कंदील देण्यात आला होता. त्यामुळे अधिकृतरित्या या लशीचा लहान मुलांसाठी वापराला मंजुरीचा मार्ग मोकळा झाला. लसीकरणासंबंधी नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीकडून (Subject Expert Committee – SEC) ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ला (DGCI) २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ‘कोवाक्सिन’च्या वापरासाठी शिफारस केली होती. ही शिफारस देशाची औषध नियंत्रण संस्था ‘डीजीसीआय’कडून मंजूर करण्यात आली आहे.

त्यामुळे, आता लवकरच भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद निर्मित ‘कोवॅक्सिन’ ही लस लहान मुलांसाठी उपलब्ध होऊ शकते.

आतापर्यंत कोवॅक्सिन ही लस १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी उपलब्ध होती. मात्र, आता ही लस लहान मुलांनाही करोनाच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी वापरली जाणार आहे. या लशीच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

‘पोक्सो’ पीडितांमध्ये ९९ टक्के मुली
बालविवाहांमुळे रोज ६० मुलींचा मृत्यू

महत्त्वाचे मुद्दे :-

– कोवॅक्सिनच्या चाचणीत सकारात्मक परिणाम समोर आल्यानंतर डीजीसीआयनं या लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. चाचणीत लसीचा लहान मुलांवर कोणताही साईड इफेक्ट दिसून आलेला नाही.

– लहान मुलांवर या लशीच्या डोसचा वापर करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येत आहेत. गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या मुलांवर या लशीचा पहिल्यांदा वापर करण्यात येणार आहे.

– लशीमुळे लहान मुलांच्या शाळेत जाण्याचाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

– करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका व्यक्त केला जात होता. मात्र, आता लशीमुळे हा धोका नियंत्रित केला जाऊ शकतो.

– डीजीसीआयच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात मुलांना ही लस मिळेपर्यंत जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या लशीच्या उत्पादनासाठी ही वेळ लागण्याची शक्यता आहे.

– भारतापूर्वी काही देशांनी लहान मुलांना करोना लस द्यायला सुरूवात केली आहे. युरोपियन युनियनकडून जुलै महिन्यापासून ‘मॉडर्ना’ लशीच्या वापराला मंजुरी देण्यात आलीय.

Coal and Power Crisis: कोळसा संकटात देशवासियांच्या मदतीला रेल्वे धावली!
Adani Ports: इराण, पाक, अफगाणचा माल हाताळणार नाही; ‘अदानी पोर्ट’चा निर्णय

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here