कॅलिफोर्निया: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात एक लहान विमान निवासी भागात कोसळले. हे अपघातग्रस्त विमान थेट घरांवर कोसळले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाले आहेत.
वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे लहान विमान दोन इंजिन असणारे होते. विमान हवेत असताना त्यात अचानक बिघाड झाला. या बिघाडामुळे अचानकपणे हे विमान निवासी भागात कोसळले. विमान कोसळताच एक स्फोट झाला आणि भीषण आग लागली. या आगीची झळ काही घरांनादेखील बसली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि इतर प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
या विमान अपघातात पायलटसह दोघांचा मृत्यू झाला. तर, ३-४ जण गंभीर जखमी झाले. हा विमान अपघात एका शाळेजवळ झाला. हे लहान विमान घरावर कोसळल्यानंतर एका ट्रकवरदेखील आदळले. अपघातग्रस्त विमानाच्या स्फोटामुळे काही घरांना आग लागली.