हायलाइट्स:
- पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिगुंठा १३५ रुपये
- सरकारच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
- सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या चर्चेत २०१९ च्या जीआरप्रमाणे पूरग्रस्तांना निधी देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार प्रतीगुंठा ९०० रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतु, केवळ १३५ रुपये प्रति गुंठा मदत जाहीर झाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
पूरग्रस्तांना नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या तोकड्या मदतीवरून पूरपट्ट्यात सरकारच्या विरोधात नाराजी वाढत आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ मंगळवारी सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत २०१९ च्या आपत्ती व्यवस्थापन जीआरनुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असा आग्रह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी धरला.
यावेळी बोलताना सर्वच पदाधिकाऱ्यांनी वाढीव मदतीची मागणी केली. तातडीने वाढीव मदत जाहीर करून शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महेश खराडे, पोपट मोरे, संदीप राजोबा, संजय बेले, शमसुद्दीन संडे, भागवत जाधव, बाबा सांदरे, संजय खोलखुंबे, सुरेश वसगडे, आदी उपस्थित होते.
दरम्यान, जुलै महिन्यात महापुराने झालेल्या नुकसानीनंतर राज्य सरकारकडून पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले जात आहेत. सर्व पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा केल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक पूरग्रस्तांना अजूनही मदतीची रक्कम मिळालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कारभाराविरोधात पूरग्रस्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times