हायलाइट्स:
- केमस्पेक या केमिकल कारखान्याला आग
- सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली दुर्घटना
- आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही
तळोजा एमआयडीसी येथील केमस्पेक या केमिकल कारखान्याला आज सायंकाळी ५.३० च्या सुमारास भीषण आग (Taloja MIDC Fire) लागली. या आगीत कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासन दाखल झाले. या कंपनीची आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कारखान्यांमध्ये केमिकल कारखान्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. केमस्पेक या कारखान्यात आज लागलेल्या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी वारंवार या कारखान्यात अशा आगीच्या घटना घडत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रसायन मिश्रीत प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारच्या आगीच्या घटना घडत असतात. मात्र वारंवार अशा भीषण आगीच्या घटना घडत असूनही त्याबाबत उपाययोजना करण्यामध्ये हलगर्जीपणा करण्यात येत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, तळोजा औद्योगिक वसाहतीत आगीच्या घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी या परिसरात वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आगामी काळात याबाबत काही पाऊल उचलले जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times