म. टा. खास प्रतिनिधी,

कोळसाटंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी दिली. राज्यात मागणीच्या तुलनेत तीन हजार मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. ही तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी नमूद केले. वीजटंचाईबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी मी मागील दोन महिन्यांपासून केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी व केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्याशी नियमित संपर्कात असून लवकरच या संकटावर मात केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साधारण पावसाळ्यात म्हणजे जून-सप्टेंबर या कालावधीत विजेच्या मागणीत घट होत असते. परंतु ऑगस्टमध्ये विजेची मागणी वाढली. या मागणीची पूर्तता करण्यासाठी कोळशाचा १८ लाख मेट्रिक टन साठा वापरावा लागला. कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची रोजची क्षमता ४० लाख मेट्रिक टन आहे. मात्र पावसामुळे ती २२ लाख मेट्रिक टनपर्यंत खालावली होती. ती आता २७ लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली आहे, असे ते म्हणाले.

स्वस्त वीजपुरवठा बंद

कोल इंडियाकडून मिळणारा कोळसा अपेक्षित दर्जाचा नाही. त्यामुळे विजेचे उत्पादन व दर्जाही अपेक्षित प्रमाणानुसार होत नाही. याशिवाय गॅसवर वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी करारानुसार गॅस मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या संकटात भर म्हणजे ज्यांच्याशी दीर्घकालीन करार केले आहेत अशा सीजीपीएल आणि जेएसडल्ब्यू या कंपन्यांनी स्वस्त वीजपुरवठा बंद केलेला आहे. त्यामुळे एक हजार मेगावॉट विजेचा पुरवठा त्यांच्याकडून केला जात नाही. या कंपन्यांनी वीजनिर्मितीच बंद ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.

वीज उत्पादनात वाढ

मुंबई : राज्यातील कोळशाचा साठा व वीजनिर्मितीमध्ये वाढ होऊ लागली आहे. ४८०० मेगावॉटवर घसरलेले राज्य सरकारी महाजेनको (महानिर्मिती) कंपनीचे औष्णिक वीज उत्पादन आता ५५०० मेगावॉटच्या घरात पोहोचले आहे. प्रामुख्याने भुसावळ, परळी, खापरखेडा व चंद्रपूर येथील ऊर्जा प्रकल्पातील वीज निर्मिती वाढली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here