हायलाइट्स:
- करोना मृतांच्या कुटुंबांना ५० हजारांच्या आर्थिक मदतीची घोषणा
- जिल्हा उपायुक्तांना पत्र धाडून यादी सादर करण्याचे आदेश
- पंजाबमध्ये गेल्या २४ तासांत २० रुग्ण दाखल
पंजाबमध्ये तब्बल १६ हजार ५३१ नागरिकांच्या करोनामुळे मृत्यूची नोंद झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार अद्याप कोविड मृतांची यादी तयार करण्यावर काम करत आहे. या यादीच्या आधारावर लवकरच पीडित कुटुंबांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत पुरविली जाईल.
यासंबंधी जिल्हा उपायुक्तांना एक पत्रही धाडण्यात आलंय. या पत्रात येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत मृतांची यादी राज्य सरकारपर्यंत पोहचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एक निश्चित प्रक्रिया पार पडल्यानंतर पीडित कुटुंबांपर्यंत हा मदतनिधी पोहचू शकेल.
याआधी राज्य सरकारकडून केवळ डॉक्टर, नर्स आणि विशेष ड्युटीवर तैनात पोलीस दलाला ‘करोना योद्ध्या’चा दर्जा देण्यात आला होता. मृत करोना योद्ध्यांच्या कुटुंबांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा याआधीच पंजाब सरकारनं केली होती. आता मात्र, मृत सामान्य नागरिकांच्या कुटुंबांनाही मदत मिळू शकणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या २४ तासांत पंजाबमध्ये केवळ २० नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. यात पटियालातील पाच तर फरीदकोट आणि कपूरथलातील तीन – तीन रुग्णांचा समावेश आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times