राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून भाजपचे नेते ठाकरे कुटुंबाला सातत्यानं लक्ष्य करताना दिसत आहेत. नाशिक येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’च्या संपादकपदावरून ठाकरेंना टोला हाणला होता. ‘कोणताही अनुभव नसताना मुलाला कॅबिनेट मंत्रीपद दिलं. आता रश्मी ठाकरे यांना ‘सामना’चं संपादकपद दिलं. ठाकरे आता सगळंच घेऊ लागलेत,’ असं पाटील म्हणाले होते. पाटील यांच्या या टीकेला रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सणसणीत उत्तर दिलं आहे.
‘आदित्य ठाकरेंच्या अनुभवापेक्षा त्यांचं काम बघा. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधकाची भूमिका तुम्ही पार पाडू शकता,’ असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘भाजपच्या सत्ताकाळात मंत्रिपदाचाही अनुभव नसलेल्या एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. त्या अनुभवाबद्दल तर तुम्हाला बोलायचं नाही ना,’ असा चिमटाही रोहित यांनी चंद्रकांत पाटलांना काढला आहे.
वाचा:
मुंबई महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचं मिशन राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलं आहे. त्यावर भाजपचे आमदार यांनी खोचक टीका केली होती. त्यालाही रोहित यांनी उत्तर दिलं आहे. ‘भारतीय जनता पक्षाचे सुरुवातीला केवळ दोन खासदार होते. त्याच पक्षाची आज केंद्रात सत्ता आहे. भाजपला आलेले हे ‘अच्छे दिन’ निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यात भाजपला आलेले ‘बुरे दिन’ पक्षाच्या नेत्यांच्या अहंकाराचं फळ आहे,’ असं रोहित यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times