पालघर : विक्रमगड येथील एन. डी. वाडेकर यांच्या घराजवळ देवगांडूळ (सिसिलिअन) हा दुर्मिळ प्रजातीचा उभयचर जीव आढळून आला आहे. सापसारखा दिसणारा हा जीव या परिसरात आढळून आला. विक्रमगड येथील सर्प मित्र पार्थ पटेल यांना लोकांनी कळवताच घटनास्थळी धाव घेत प्रथम दर्शनी हा मांडूळ असल्याचा लोकांना अंदाज होता. परंतु, सर्प मित्र पार्थ पटेल यांनी नीट निरीक्षण केल्यानंतर हा मांडूळ नसुन उभयचर जीव (सिसिलिअन) ग्रामीण भाषेत देवगांडूळ बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. या देव गांडूळाला सुरक्षित स्थळी सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एमएसी (प्राणीशास्त्र) चे शिक्षण घेतलेले सर्प मित्र ऋषिकेश शेलका यांनी या बाबत माहिती देताना सांगितले की सिसिलियन ( Caecilian) आपल्या पालघरच्या बोली भाषेत ‘वावीर’ मराठीत बोलतात. हा एक उभयचर वर्गातील प्राणी आहे. ( उदा. बेडूक इ.) पाय नसल्यामुळे आणि निमुळत्या लांब शरीरामुळे प्रथदर्शनी तो सापासारखा वाटतो. ते आपला बहुतेक जीवनकाळ ओलसर जमिनीच्या खाली घालवतात त्यामुळे ते आपल्याला खूप कमी परिचित आहेत. ते अमेरिका, आफ्रिका आणि  दक्षिण आशियामध्ये आढळून येतात. त्यांच्या आहारात प्रामुख्याने गांडूळाचा समावेश होतो.

Sicilian | विक्रमगडमध्ये आढळला दुर्मिळ देवगांडूळ! काय आहेत वैशिष्ट्ये जाणून घ्या

वावीर पूर्णपणे पायविहरीत असतात, त्यांच्या लहान प्रजाती गांडूळासारख्या आणि मोठ्या प्रजाती 5 फुटापर्यंत लांब आणि सापा सारख्या वाटतात. त्यांची त्वचा गुळगुळीत आणि प्रामुख्याने गडद पण काही प्रजातीमध्ये रंगीबेरंगी त्वचा दिसून येते. स्वतःला वाचवण्यासाठी ते त्वचेमधून विषारी द्रव्य सोडतात. त्वचेमधून निघणाऱ्या द्रव्यात Siphonops paulensis नावाच्या द्रव्याचा समावेश असतो. वावीरची दृष्टी फक्त अंधारात बघण्यासाठी विकसित झालेली असते आणि ते आपला बहुतेक जीवनकाळ जमिनीखाली घालवतात. त्यांची डोक्याची कवटी आणि टोकदार तोंडाचा भाग चिखलातून वाट काढायला वापरतो. त्याच्या शरीराचे स्नायू चिखलातून वाट काढण्याच्या दृष्टीने विकसित झालेले आहेत. सर्व सिसिलियन प्रजाती डोळे आणि नासिकामध्ये असलेल्या संवेदनाग्र (antenna) चा वापर संवेदनेसाठी करतात. सगळ्या सिसिलियन प्रजातीमध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी फुफ्फुसे असतात पण त्याचबरोबर ते त्वचा आणि तोंडाचा वापर सुदधा करतात. त्यांचं डाव फुफ्फुस उजव्या फुफ्फुसापेक्षा खूपच लहान असते, असे अनुकूलन सापांमध्ये सुदधा दिसून येते. 75% सिसिलियन प्रजाती हे जिवंत पिलांना (viviparous) जन्म देतात तर इतर 25% प्रजाती अंडी ( oviparous) देतात आणि त्यातून पिल्लं बाहेर येई पर्यंत रक्षण करतात.

Sicilian | विक्रमगडमध्ये आढळला दुर्मिळ देवगांडूळ! काय आहेत वैशिष्ट्ये जाणून घ्या

प्रौढ सिसिलियन कीटक, गांडूळ, वाळवी ह्यावर गुजराण करताना आढळून येतात. सापासारखा दिसणारा, सरपटणारा आपल्या आसपासच असून आपल्या नजरेपासून लपून आहे. तसेच गैरसमजुतीमुळे साप समजून मारण्याचे प्रमाण आहे. वावीर हा उभयचर भारतातून लुप्त होत चालला असून ज्या ठिकाणी जलसाठे प्रदूषण विरहित आणि स्वच्छ असतात अश्याच ठिकाणी आढळतो. आपल्या परिसरात तो आढळतो याचा अर्थ अजूनही आपल्या इथे गोड्या पाण्यातील जैवविविधता बऱ्याच अंशी टिकून आहे. सिसिलियन (वावीर) पासून माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे आता पुढच्या वेळी तुम्हाला सुद्धा हा आगळा वेगळा जीव दिसल्यास त्याला न मारता वाचवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन सर्पमित्र  ऋषिकेश शेळका यांनी केले आहे.

Sicilian | विक्रमगडमध्ये आढळला दुर्मिळ देवगांडूळ! काय आहेत वैशिष्ट्ये जाणून घ्या

उभयचर जिव (सिसिलिअन) हा विक्रमगड भागात मिळण्याची तिसरी वेळ आहे. हा जिव दुर्मिळ झाला असुन साप समजून या जिवाला मारले जाते. त्यामुळे या जीवाची संख्या कमी झाली आहे. त्याच्या संरक्षणाची गरज आहे. ग्रामीण भागात याला देवगांडूळ ही बोलतात, अशी प्रतिक्रिया विक्रमगड येथील सर्पमित्र पार्थ पटेल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here